Pune Year Ender: 2022 मध्ये मेट्रो धावली, चांदणी चौकातील पूलही पाडला मात्र वाहतूक कोंडी 'जैसे थे'
येत्या नववर्षात तरी पुण्यातील वाहतूक कोंंडीवर योग्य उपाययोजना होतील आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून मोकळा श्वास घेता येईल, अशी अपेक्षा आहे.
Pune Year End 2022 : पुण्यात मागील (pune)काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक पुणेकर या वाहतूक कोंडीला वैतागले आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी यापूर्वी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शिवाय सम विषम तारखेनुसार पार्किंगही सुरु करण्यात आलं. अनेक रस्ते वन वे करण्यात आले. मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही 'आ' वासून उभा आहे. महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात मेट्रो सुरु करण्यात आली होती. प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी मेट्रो सुरु करण्यात आली. कर्वे नगरला जाणाऱ्या रस्त्यावर डबल डेकर पूल बांधण्यात आला, एवढंच नाही तर अनेक वर्ष जुना असलेला चांदणी चौकातला पूलही पाडला मात्र वाहतूक कोंडी जैसे थे असल्याचं चित्र आहे.
अनेक मार्गांवर मेट्रोचं काम सुरु असल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी
6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोचं (pune metro) उद्घाटन झालं आणि लाखो पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण झालं. मोदींनी स्वत: तिकीट काढत शाळकरी विद्यार्थ्यांसोबत मेट्रोची सफर केली होती. त्यानंतर कोथरुड परिसरातील एमआयटी कॉलेजमध्ये त्यांनी सभाही घेतली. यावेळी पुण्याच्या अनेक नव्या प्रयोगांचं लोकार्पण त्यांनी केलं. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सुखकर होईल, असं अनेक पुणेकरांना वाटलं होतं. त्यामुळे 2022 पुणेकरांसाठी स्वप्नपूर्ती होती. मात्र उर्वरित मेट्रोच्या कामामुळे पुणेकरांना अति मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील अनेक मार्ग काही दिवसांसाठी बंद करण्यात आले तर अनेक मार्गांवर मेट्रोचं काम सुरु असल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मेट्रो धावली मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहिला.
पुणे-बंगलोर हायवेवरदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व्हायची. चांदणी चौकात (Chandani chowk) वाहनांच्या दूर दूरपर्यंत रांगाच्या रांगा लागायच्या. पुणे ते हिंजवडीला जायला किमान तीन तास लागत होते. त्यामुळे बंगलोर हायवेवरुन रोज ये-जा करणारे पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त झाले होते. त्यानंतर पुणेकरांनी थेट आक्रमक पावित्रा घेतला आणि साताऱ्याला जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा ताफा अडवला. मुख्यमंत्र्याचा ताफाही याच वाहतूक कोंडीच काही वेळ अडकला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडीला अडथळा येत असलेला चांदणी चौकातील पूल पाडण्याचा आदेश दिला. पूल पाडण्यासाठी सगळी तयारी करण्यात आली. स्फोटकं लावून इडिफिस इंजिनिअरींग या कंपनीने अखेर 2 ऑक्टोबरला हा पूल जमीनदोस्त केला. या पुलावरुन पुण्यात अनेक विनोद झाले. त्यावेळी अनेक रिल स्टार्सने रिल्स केलं. अनेक समाजमाध्यमांनी या पूल पाडण्याचा मोठा सोहळा केला. पूल पडला मात्र वाहतूक कोंडी जैसे थेच राहिली.
2022 या वर्षांतील पुणेकरांचे अनेक तास वाहतूक कोंडीतच गेले. दुपारी 1 ते 4 झोपणारे पुणेकर वाहतूक कोंडीमुळे जागेवरच अडकले. त्यामुळे येत्या नववर्षात तरी पुण्यातील वाहतूक कोंंडीवर योग्य उपाययोजना होतील आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून मोकळा श्वास घेता येईल, अशी अपेक्षा आहे.