(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News: कागदपत्रावरचे फोटो वापरुन नग्न फोटो केले तयार; 21 वर्षीय तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी
एका 21 वर्षीय मुलीने कॉलेजची फी भरण्यासाठी ऑनलाइन कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला. या अर्जामुळे तिचे अश्लील व्हिडिओ आणि नग्न फोटो तयार केले आणि फोटोंमध्ये मुलीचा चेहरा वापरला
Pune Crime News: एका 21 वर्षीय मुलीने कॉलेजची फी भरण्यासाठी ऑनलाइन कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला. या अर्जामुळे तिचे अश्लील व्हिडिओ आणि नग्न फोटो तयार केले आणि फोटोंमध्ये मुलीचा चेहरा वापरला. फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोहगाव परिसरात घडला आहे. याप्रकरणी लोहेगाव येथील 21 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नक्की काय घडलं?
21 वर्षीय तरुणी ही एका महाविद्यालयात शिकत आहे. तिला कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे हवे होते. त्यानंतर तिला इंटरनेटवरुन कोको अॅपची माहिती मिळाली. या अॅपवरुन शिक्षणासाठी पैसे मिळातात, असं एकाने सांगितलं होतं. त्यानंतर तिने गुगल प्ले-स्टोअरवरून कोको अॅप डाउनलोड केले आणि अॅपवर आवश्यक ती सर्व माहिती अपलोड केली. त्यानंतर तरुणीला झारखंडमधून फोन येऊ लागले.
तरुणीने अॅपवर अपलोड केलेल्या कागदपत्रांचा वापर करून कोणीतरी अश्लील व्हिडिओ आणि नग्न फोटो तयार केले आणि फोटोंमध्ये मुलीचा चेहरा वापरला. हे फोटो आणि व्हिडिओ तरुणीला पाठवले. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याच्या धमक्या देऊ लागले. तरुणीच्या संपर्कात असलेल्या एका मैत्रीणीला शेअर करुन तिची बदनामी केल्याला आरोप तरुणीने तक्रारीत केली आहे. त्यानंतर तिने पुणे शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सध्या सोशल मीडियावरुन आणि या फेक अॅपवरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. अनेक लोक सतर्कता बाळगण्याचं आवाहन सायबर पोलिसांकडून सातत्याने करतात. मात्र नागरिक याचं पालन करत नाही. तरुण मंडळी या सगळ्याचा जास्त वापर करतात. लोन आणि विविध गोष्टी सोप्या होतील, असं त्यांना वाटतं मात्र तरुणच या जाळ्यात जास्त प्रमाणात अडकल्याच्या बातम्या येतात. जेष्ठ लोकांना या संबंधित अधिक माहिती नसल्याने त्यांची फसवणुक होण्याची शक्यता जास्त असते.