Amol Kolhe: शहाजीराजे आणि जिजामाता हेच शिवाजी महाराजांचे खरे गुरू; अमोल कोल्हेंनी राज्यपालांना ठणकावलं
कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत. असं खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या समोरच ठणकावून सांगितलं.
Amol Kolhe: कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत. असं खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या समोरच ठणकावून सांगितलं. राज्यपालांनी स्वामी समर्थ हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला अनुसरूनच कोल्हे यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण, हे जाहीरपणे सांगितलं.
पुण्याच्या खेडमध्ये हुतात्मा राजगुरूंच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात कोल्हे बोलत होते. त्यानंतर बोलताना राज्यपालांनी कोल्हेच्या वक्तव्यावर भाष्य करणं टाळलं. मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीच देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, असं म्हणणं हे एकतर्फी राहील. कारण दुसरीकडे हुतात्मा राजगुरूंप्रमाणे अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं. हे विसरून चालणार नाही. याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं.
राज्यातील सध्याच सरकार हे राज्यपालांच्या ऐकण्यातलं आहे. त्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी मदत करा, असे आदेश ते या सरकारला देतील. अशी टिपणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहितेंनी केली. याला प्रतिउत्तर देताना तुमचे नामदार हे कामदार आहेत. मात्र फक्त नामाचा तर मी आहे, राज्यपालांकडे तर काहीच नसतं. असं मिश्कीलपणे नमूद केलं, पण पुढे बोलताना स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, असं आश्वासन दिलं.
भारताला मी हनुमानाप्रमाणे समजतो. भारत हा माझा हनुमान आहे. जसं हनुमानाला पर्वत उचलणं शक्य वाटत नव्हतं मात्र त्यांच्यात विश्वास निर्माण केल्यावर हनुमानाने थेट पर्वत उचलून आणलं. तसाच आपला भारत आहे. बलाढ्य आहे. मात्र कोणीतही तो आत्मविश्वास भारताला देण्याची गरज आहे, असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.
वर्षात एका दिवशी या सगळ्या हुतात्म्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करुन काहीही होणार नाही आहे. त्याचे विचार पेरायला हवे, पुढच्या पीढीपर्यंत ते पोहचवायला हवे. तरुणांना यासंदर्भात अभ्यास करायला लावायला हवा. जगात भारत पुढे न्यायचा असेल तर हा इतिहास आपण लक्षात ठेवायला हवा, असंही ते म्हणाले.