Pune Ring Road : पुणे रिंग रोडसाठी भूसंपादनाचं काम अंतिम टप्यात; 2 हजार 635 कोटींचा मोबदला वाटप
पुण्यातील पश्चिम रिंग रोडच्या भूसंपादनासाठी 2 हजार 635 कोटींचा मोबदला वाटप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
Pune ring Road : पुण्यातील पश्चिम रिंग रोडच्या (Pune Ring Road) भूसंपादनासाठी 2 हजार 635 कोटींचा मोबदला वाटप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या तसेच कोल्हापूर, सासवड, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, माणगाव, कोकण व मुंबई या भागातून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून जावे लागते. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूकीवर त्याचा ताण पडत आहे. बाहेरून येणारी वाहने शहराच्या आत न आणता बाहेरून योग्य त्या दिशेला वळविण्याकरीता शहराबाहेरून रिंग रोड बनवणे आवश्यक असल्याने शासनाने 2015 मध्ये पुणे शहराभोवती रिंग रोड बांधण्याचा शासनाने निर्णय घेतला होता.
या प्रकल्पाकरीता अंमलबजावणी यंत्रणा म्हणून शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला नियुक्त केले आहे. हा प्रकल्प पूर्व व पश्चिम अशा दोन टप्प्यात विभागला आहे. प्रकल्पाची आखणी अंतिम झाल्यानंतर पूर्व व पश्चिम चक्राकार महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्राथमिक अधिसूचना 2021 मध्ये प्रसिद्ध झाल्या.
प्रकल्पासाठी आवश्यक मोजणीला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. कोरोना संकटाचा कालावधी असतानाही जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधून त्यांना प्रकल्पाचे महत्व समजावून सांगितले. भूसंपादनामुळे होणारा आर्थिक लाभ भूधारकांना समजावून सांगण्यात यश आल्याने संयुक्त मोजणीचे काम अल्पावधीत पूर्ण करण्यात आले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सहा तालुक्यातील सुमारे 84 गावातून जमीन संपादन करणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी विविध प्रकारच्या बाधीत होणाऱ्या जमिनीसाठी दर निश्चिती करण्यात आली. नंतरच्या काळात मुल्यांकनासंदर्भात शासनाने 24 जानेवारी 2023 रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिलेल्या सुचनेनुसार निश्चित केलेले दर रद्द करून नव्याने दर निश्चिती करण्यात आली. असे करताना भूधारकांचे समाधान योग्यप्रकारे होईल याचीदेखील दक्षता घेण्यात आली.
नवीन दरानुसार मोबदला निश्चिती करून पहिल्या टप्प्यात पुणे (पश्चिम) चक्राकार मार्गाच्या एकूण ३२ गावांतील भूधारकांना संमतीचे विकल्प दाखल करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या. भूधारकांनी संमती दिल्यानंतर त्यांना २५ टक्के अतिरिक्त मोबदला प्राप्त होण्यासाठी सर्व भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वतंत्र भूसंपादन कक्ष कार्यान्वित करण्यात आले. पश्चिम चक्राकार मार्गातील मावळ, मुळशी, हवेली व भोर तालुक्यातील संपादित करावयाच्या सुमारे ६४५ हेक्टर जमिनीपैकी ३०७ हेक्टर क्षेत्र संमतीने घेण्यात आले. उर्वरीत क्षेत्राचे भूसंपादनाचे निवाडे जाहीर करण्यात येवून प्रकल्पाकरिता जमीन हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
पूर्व रिंग रोड मार्गातील मावळ, खेड, हवेली, पुरंदर आमि भोर तालुक्यातील एकूण 48 गावांतील दर निश्चिती पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी खेड तालुक्यातील 12, मावळ तालुक्यातील 6 व हवेली तालुक्यातील ५ गावांतील मोबदला निश्चिती करून मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुणे चक्राकार मार्गासाठी संपादनाकरीता 2 हजार 625 कोटी रुपये रक्कमेचा मोबदला भूधारकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आजवर झालेल्या सार्वजनिक प्रकल्पांच्या भूसंपादनाकरीता वाटप करण्यात आलेल्या मोबदल्यापेक्षा हा सर्वाधिक मोबदला आहे. शासनाच्या मुल्यांकनासंदर्भातील नवीन परिपत्रकानंतर केवळ एक वर्षाच्या आत भूसंपादनाची प्रथम टप्यातील कार्यवाही ज्यात संयुक्त मोजणी वहिवाटीप्रमाणे करणे, दर व मोबदला निश्चिती, भूधारकांचे समुपदेशन करून जास्तीत जास्त संमतीचे विकल्प घेणे, संमती विकल्पानुसार मोबदला वाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यासाठी नियुक्त समितीच्या नियमितपणे बैठका, कार्यशाळा घेण्यात आल्या.
इतर महत्वाची बातमी-
Pune Metro trial : इतिहासात पहिल्यांदाच मुठा नदीच्या गर्भातून धावली पुणे मेट्रो; पाहा व्हिडीओ...