Pune Rain Updates: बारामती पट्ट्यात ढगफुटीसारखा पाऊस, कालवा फुटला, नद्यांना पूर, घराघरांत पाणी; दौंड-इंदापूरलाही झोडपले
Pune Rain Updates: पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं.

Pune Rain Updates: मान्सूनच्या आगमनाने केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Updates) सुरु आहे. मुंबई आणि पुण्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Pune Rain Updates) जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या दोन टीम देखील दाखल झाल्या आहेत.
बारामतीमध्ये तुफान पावसानं हजेरी लावली आहे. अशातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गावर आलं असून काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पाहणी केली. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. या कालव्याची देखील अजित पवारांनी पाहणी केली. या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचलंय. तिकडे पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.
अतिवृष्टीसारखा तुफान पाऊस-
बारामती-दौंड-इंदापूरला पावसानं झोडपलं आहे. अक्षरशः अतिवृष्टीसारखा तुफान पाऊस कोसळला. या मुसळधार पावसामुळे कालवा फुटला, नद्यांना पूर आला तसेच अनेक घराघरांत पाणी शिरले. दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेलाय. इथं पाण्याचा प्रवाह इतका होता की एक इनोव्हा कार वाहून गेली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. बारामतीत वर्षभराच्या सरासरीच्या निम्मा पाऊस पडल्याची माहिती अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली. एका रात्रीत बारामतीत 7 इंच पावसाची नोंद झाली. बारामतीच्या पावसाची वार्षिक सरासरी 14 इंच आहे. वर्षात साधारणपणे 450 मिलिमीटर पाऊस तालुक्यात पाऊस पडतो. त्यातील मागच्या 5 दिवसांत 314 मिलिमीटर पाऊस पडला आहे. कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. तसेच पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांना पाणी शिरून फटका बसला आहे..
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये-
मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार आहे. या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.























