(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे अपघात, पिझ्झाचे बॉक्स आम्ही बघितले; शिवसेना समन्वयकांचा दावा, सांगितलं काय घडलं
पबमधून दारुन प्यायल्यानंतर जवळपास 200 किमीच्या वेगाने कार चालवून विशाल अग्रवाल या बड्या बिल्डरच्या मुलाने बाईकस्वारास धडक दिली
पुणे: पुण्यातील कल्याणी नगर परिसरात दारुच्या नशेत भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत एका श्रीमंत बापाच्या अल्पवयीन मुलाने दोघांना उडवले. या अपघातात (Accident) अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या धनिकपुत्राच्या मदतीसाठी चक्क एका आमदाराने पोलीस स्टेशन गाठले होते. तर, पोलिसांनीही या बड्या बापाच्या लेकासाठी पाहुणचार केल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. विशेष म्हणजे या धनिकपुत्रासाठी पोलिसांकडून चक्क पिझ्झा (pizza) आणि बर्गर पुरवण्यात आल्याचा आरोपही पीडितांच्या नातेवाईकांनी केला होता. आता, शिवसेना (Shivsena) शहर समन्वयकांनीही स्वत: घडलेला प्रसंग सांगितला.
पबमधून दारुन प्यायल्यानंतर जवळपास 200 किमीच्या वेगाने कार चालवून विशाल अग्रवाल या बड्या बिल्डरच्या मुलाने बाईकस्वारास धडक दिली. या धडकेत अनिश आणि अश्विनी हे दोन आयटी इंजिनिअर जागीच गतप्राण झाले होते. इतक्या गंभीर दुर्घटनेनंतरही पोलिसांनी धनिकपुत्राला विशेष वागणूक दिल्याचे आरोप झाले होते. अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांना रविवारी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने या मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्यपदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात नेले, अशी चर्चा होती. आता, शिवसेना शहर समन्वयक शंकर संगम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोलिसांकडून धनिकपुत्रासाठी रॉयल ट्रिटमेंट मिळाल्याची चांगलीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे पत्रकारांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं. त्यावेळी, याचा तपास सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही येरवाडा ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. तर, आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरणही दिलं. पिझ्झा पार्टी झाल्याचं तपासात आढळून आलं नाही. यात अजिबात तथ्य नाही, असे अमितेश कुमार यांनी म्हटले होते. मात्र, आता शिवसेना शहर समन्वयक शंकर संगम यांनी घडलेला प्रसंग सांगितला आहे.
पिझ्झाचे बॉक्स पाहिले
पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिस ठाण्यात पिझ्झा खायला देण्यात आला असा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक असलेल्या शंकर संगम यांनी केला आहे. शंकर संगम हे अपघात झाल्यावर रविवारी येरवडा पोलीस ठाण्यात शिष्टमंडळासह निवेदन देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी आरोपीसाठी पिझ्झाचे बॉक्स नेताना पाहिले, असा त्यांचा दावा आहे.
लाडल्याच्या आजोबाला पोलीस कोठडी
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा