Pune Porsche Car Accident: टीकेचा धुरळा खाली बसताच लाडक्या लेकासाठी अग्रवाल कुटुंबाच्या हालचाली, आधी पोर्शे कार मागितली, आता म्हणतात लेकाचा पासपोर्ट परत द्या
Pune crime news: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. या अपघातानंतर अग्रवाल कुटुंबीयांची मुजोरी आणि कायदा धाब्यावर बसवण्याच्या वृत्तीबद्दल संताप व्यक्त करण्यात आला होता. धनिकपुत्राचा पासपोर्ट मागितला
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राच्या कुटुंबीयांनी याप्रकरणातील टीकेचा आणि रोषाचा धुरळा खाली बसताच हालचाली सुरु केल्या आहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला याप्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करता आली नव्हती. तसेच बालहक्क संरक्षण नियमांच्या आधारे हा धनिकपुत्र तुरुंगातून सुटला होता. मात्र, त्याचे आई-वडील सध्या तुरुंगातच आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
अशातच आता अग्रवाल कुटुंबीयांनी बालहक्क न्याय मंडळाकडे एक अर्ज केला आहे. त्यानुसार अग्रवाल कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा पासपोर्ट परत द्यावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वी अग्रवाल कुटुंबीयांनी ज्या कारची धडक बसून अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला होता, ती अलिशान आणि महागडी पोर्शे कार परत देण्याची मागणीही केली होती. बालहक्क न्याय मंडळासमोर बुधवारी या अर्जावर सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी बालहक्क न्याय मंडळाने या धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहण्याची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे पुढील सुनावणीत बालहक्क न्याय मंडळ काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
याशिवाय, मुलाला प्रौढ समजून त्याच्यावर खटला चालवण्यासाठी पोलिसांनी बालहक्क न्याय मंडळात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 26 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मात्र, बचावपक्षाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखल देत मुलाला प्रौढ ठरवता येणार नाही, असे म्हटले होते.
पुण्यात नेमकं काय घडलं होतं?
पुण्यातील या अपघातामुळे राज्यभरात गदारोळ झाला होता. विशाल अग्रवाल यांचा मुलगा दारु पिऊन भरधाव वेगात पोर्शे कार चालवत होता. त्याने बाईकवरुन जात असलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांना धडक दिली होती. या धडकेमुळे अश्विनी कोस्टा हवेत तब्बल 15 फुट उंच फेकली गेली होती आणि जमिनीवर आपटली होती. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनिश अवधिया याचाही काहीवेळाने मृत्यू झाला होता. मात्र, यानंतर विशाल अग्रवाल यांच्या मुलावर कठोर कारवाई करण्याऐवजी पुणे पोलीस, ससून रुग्णालय अशा सर्व शासकीय यंत्रणा धनिकपुत्राला वाचवण्यासाठी कामाला लागल्या होत्या.
पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर पुरवण्याइतप विशेष वागणूक दिली होती. तसेच या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलले होते. धनिकपुत्राचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी आपल्या ड्रायव्हरला धमकावण्यापासून ते पैसे दाबण्यापर्यंत शक्य ते सर्व प्रयत्न करुन पाहिले. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले होते. मात्र, विशाल अग्रवाल यांचा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला तुरुंगातून सोडण्यात आले होते.
आणखी वाचा