Pune Accident : पोर्शे अपघातावेळी गाडीत दोन नव्हे तर तीन मित्र असल्याचं समोर, गायब झालेला तिसरा 'हायप्रोफाईल' तरूण कोण?
Pune Porsche Accident : पोर्शे अपघातात अल्पवयीन आरोपीच्या बाजूला ड्रायव्हर तर मागे त्याचे तीन मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पोलिसांच्या रेकॉर्डवर दोनच मित्र असल्याची नोंद होती.
पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपी सोबत गाडीत दोन नाही तर तीन मित्र असल्याचं समोर आलं आहे. अपघात झाल्यानंतर हा तिसरा तरूण पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे तो तिसरा तरूण कोण होता याची आता चर्चा सुरू आहे.
मागच्या सीटवर तीन मित्र होते
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मे रोजी पुण्यातील विशाल अग्रवाल या उद्योगपतीच्या मुलाने दारू पिऊन गाडी चालवली आणि दोघांचा जीव घेतला होता. यावेळी अपघातग्रस्त पोर्शेगाडीमध्ये मागे तीन तरूण असल्याचे स्पष्ट झालं आहे. पोर्शे गाडीत पुढे अल्पवयीन तरुणाच्या शेजारी ड्रायव्हर आणि मागे तीन मित्र असल्याचे तपासातून समोर आलं आहे.
अपघात घडला तेव्हा या तिसऱ्या तरुणाने पळ काढला होता. अल्पवयीन तरुणाच्या दोन मित्रांचे रक्ताचे नमुने देखील ससून रुग्णालयात बदलले गेले होते. या तीनही मुलांनी दारू प्यायल्याचं समोर आलं असून अल्पवयीन आरोपीने दारूच्या नशेत गाडी चालवल्यानेच ही घटना घडली.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या पालकांसह सात जणांविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. 25 जुलै रोजी पुण्यातील न्यायालयात यासंंबंधी 900 पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले. तथापि, त्यात 17 वर्षीय मुलाला वगळण्यात आले, ज्याचा खटला बाल न्याय मंडळ (जेजेबी) स्वतंत्रपणे हाताळत आहे.
पोर्शे कार परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाची न्यायालयात धाव
पुण्यातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पुण्यातील कल्याणी नगर परिसरात दोघांना चिरडल्यानंतर संपूर्ण राज्यसह देशभरामध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला असला, तरी अपघातग्रस्त पोर्शे कार अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आलिशान कार परत मिळण्यासाठी आता अग्रवाल कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
अग्रवाल कुटुंबीयांनी पोर्शे कार परत मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पोर्शे कारच्या सुटकेचा निकाल 28 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. अपघातातील कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांकडून बाळ न्याय मंडळात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर 28 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे कार अग्रवाल कुटुंबियांना कधी परत मिळणार याबाबत त्या दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: