Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्याच नेत्याचा दावा; कोल्हेंनी दिल्या शुभेच्छा...
खासदार अमोल कोल्हे आणि विलास लांडे या दोघांमध्ये उमेदवारीसाठी कोण निश्चित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत विलास लांडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी या शिरुर लोकसभेच्या जागेवर दावा केल्यानंतर उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. खासदार अमोल कोल्हे आणि विलास लांडे या दोघांमध्ये उमेदवारीसाठी कोण निश्चित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत विलास लांडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, विलास लांडे हे 2024ची शिरूर लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत, असं मला माध्यमांमधून समजलं. कोणाला ही महत्वाकांक्षा असणं अजिबात गैर नाही म्हणून मी विलास लांडे यांना शुभेच्छा देतो. पण शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी आपण शिरूर लोकसभेच्या मैदानात अजून असल्याचं स्पष्ट केलं. शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असं म्हणत पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले आहेत. या बॅनर्सवर विलास लांडे यांना भावी खासदार संबोधण्यात आलं आहे आणि तसंच संसदेचा फोटोही दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यातील राजकारणात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.
काय म्हणाले विलास लांडे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढली आहे. मात्र राजकारणापलीकडे जाऊन सिनेकलाकार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विलास लांडे म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांनी यांनी अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. त्यानंतर पक्ष म्हणून आम्ही 2019 च्या निवडणुकीसाठी काम केलं होतं. आजच नाही तर 1992 पासून मी राजकारणात आहे. त्यामुळेच माझे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत.
जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...
जंयंत पाटील यांनी आ आधी बोलतानां सांगितलं होतं की, शिरुर लोकसभेसाठी चाचपणी सुरु आहे. मात्र अमोल कोल्हे हे आमच्या पक्षाचे उत्तम उमेदवार आहेतच, त्यांनी लोकसभेत उत्तम कामिगरी केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अनेक काही चांगले उमेदवार आहेत. त्यांची संसदीय कारकीर्द उत्तम आहे, असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंचं कौतुक केली आहे.