PCMC Crime news : ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची भररस्त्यात निर्घृण हत्या, देहूतील घटना, हत्येचं कारण नेमकं काय?
पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली ( Crime News) आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटप्रमुख विजय थोरी यांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे आणि थोरी कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटप्रमुख विजय थोरी यांचा 23 वर्षीय मुलगा विशाल हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी त्याचा आणि आरोपींचा वाद झाला. आरोपी कपड्याचे दुकान बंद असताना हा प्रकार घडला. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता ते पुन्हा एकमेकांसमोर आले. त्यावेळी सिमेंटचे गट्टू, कुंडी आणि लाकडी बाबूंने मारहाण केली. यात विशालचा मृत्यू झाला. मुख्य आरोपी आणि विशालचे आधीपासूनच वाद होते. अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली असून चार जणांना अटक ही करण्यात आली आहे.
बावधनमध्ये महिलेची हत्या
त्यासोबत बावधन परिसरात एका महिलेच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. खळबळजनक बाब म्हणजे महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा महेंद्र जैन नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत तिचा पती महेंद्रही जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन येथील विंड विल सोसायटीत आशा पती महेंद्र, मुलगी आणि जावयासह राहत होती. तिथे त्यांचा बंगला आहे. बुधवारी सकाळी आशा यांच्या मुलीला आशा बेडरूममध्ये मृतावस्थेत पडलेली दिसली, तर महेंद्र जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तातडीने महेंद्रला रुग्णालयात दाखल केले. महेंद्रने आधी आशाची हत्या केली आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला, असा पोलिसांचा संशय आहे. सध्या ते जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नाहीत. त्याच्या चौकशीनंतरच घटना स्पष्ट होईल.
पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यातच आता भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात येत असल्याचं समोर येत आहे. हत्या आणि हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे मात्र तरीही घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-