पत्नीला भुलीचं इंजेक्शन, गाडीपर्यंत फरफटत नेऊन डांबलं; वटपौर्णिमेला पुण्यातील संतापजनक घटना समोर
Pimpri Chinchwad Crime : सुमितने पत्नीला भुलीच इंजेक्शन दिलं. थेट घरी न जाता गाडीतच डांबून ठेवलं. या दरम्यान ती शुद्धीवर आली की तो वारंवार भुलीच इंजेक्शन द्यायचा, असा आरोप पत्नीने केलाय.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) वटपौर्णिमेच्या (Vat Purnima) दिवशी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचं भरदिवसा अपहरण करण्यात आलं. ऑफिसमधून गाडीपर्यंत तिला फरफटत नेण्यात आलं. दोन दिवस तिला वारंवार भुलीचं इंजेक्शन देत, गाडीतचं डांबून ठेवण्यात आलं. कशीबशी तिनं स्वतःची सुटका केली अन् वाकड पोलीस स्टेशन (Wakad Police Station) गाठलं. अंगावर काटा आणणारा प्रताप महिलेच्या पतीनेचं केला होता. सुमित शहाणे असं या पतीचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
पत्नीला वारंवार द्यायचा भुलीच इंजेक्शन
पुण्याच्या मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट 2023 मध्ये या दोघांचं लग्न झालं. मात्र आठवडाभरात पती सुमितने नको त्या मागण्या सुरू केल्या, ज्या पत्नीला पचनी पडल्या नाहीत. मग तिने सुमितपासून लांबच राहणं पसंत केली. तिने थेट मुंबई गाठली, तिथं काही महिने ती मैत्रिणीकडे राहिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आली. इथं एका बांधकाम व्यवसायिकाकडे काम सुरू केलं. याचा सुगावा सुमितला लागला अन् त्यानं पत्नीच्या ऑफिसचा पत्ता काढला. 19 जूनला सुमित आई आणि चालकासोबत वाकडमध्ये आला. दुपारी साडे तीनच्या सुमारास पत्नीला फरपटत गाडीत बसवलं. त्यावेळी पत्नीचा मित्र ही जबरदस्तीने गाडीत बसला. गाडी मंचरच्या दिशेने निघाली, थोडं पुढं गेल्यावर सुमितने पत्नीच्या मित्राला कानशिलात लगावली आणि गाडीतून बाहेर ढकलून दिलं. तिथून पुढचा प्रवास सुरु झाला. त्या प्रवासात सुमितने पत्नीला भुलीच इंजेक्शन दिलं. थेट घरी न जाता गाडीतच डांबून ठेवलं. या दरम्यान ती शुद्धीवर आली की तो वारंवार भुलीच इंजेक्शन द्यायचा, असा आरोप पत्नीने केलाय.
बेशुद्ध असताना नेमकं काय-काय घडलं?
20 जूनच्या दुपारी तिने सुमितला विश्वासात घेतलं, तो सांगतोय त्या कागदपत्रांवर सही करते, असं ती म्हणाली. मग सुमितने गाडी मंचर परिसरात आणली, मात्र माझी भूल अद्याप उतरली नाही, असा बहाणा तिने केला, मग ते मंदिरात थांबून राहिले. त्यावेळी पत्नीने एका तरुणास खुनवत, मदतीची मागणी केली. त्या तरुणाला ही काहीतरी गडबड असल्याचं समजलं, मग तिथं मंचर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस मंदिरात पोहचले अन पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका झाली. घडला प्रसंग विवाहित महिलेने सांगितला असून तिचे पती, आई आणि चालकावर अनेक आरोप आहेत. आज सकाळी पत्नीने वाकड पोलीस स्टेशन गाठलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपहरण ते सुटका या दरम्यान बेशुद्ध असताना नेमकं काय-काय घडलं, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.
हे ही वाचा :