पुण्यात गणेशोत्सवात दारुबंदीचं टाईम टेबल, तीन विभाग, तीन तारखा, तीन ठिकाणं, कधी कुठे दारु सुरु राहणार? तपासा
Pune News: पुण्यातील गणेशोत्सवातील नियोजन आणि त्यासाठीचे नियम याबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुण्यातील काही भागातील दारुची दुकाने गणेशोत्सव काळात बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे: उद्या घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, राज्यातील अनेक मोठ्या शहरात राज्यासह देशभरातून परदेशातून लोक गणेशोत्सव पहायला येतात. गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची तयारी जवळजवळ पुर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील गणेशोत्सवातील नियोजन आणि त्यासाठीचे नियम याबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची पत्रकार परिषद पार पडली. आज नियोजन आणि त्यासाठीचे नियम याबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आयुक्तांनी सुरक्षा, वाहतूक याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर मद्यपींसाठी देखील महत्वाची बातमी समोर आली आहे.पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.
या भागातील दारुची सर्व दुकाने राहणार बंद
पुण्यातील काही भागातील दारुची दुकाने गणेशोत्सव काळात बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फरासखाना, विश्रामबाग आणि खडक या तीन विभागातील दारुची सर्व दुकाने संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात बंद ठेवण्याचा प्रस्ताव तर 7 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख या तीन दिवसांत पुणे शहरातील सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.
गणेशोत्सवात कडक सुरक्षा व्यवस्था
यावेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं 3798 सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. तर 664257 घरगुती गणपती आहेत. गणेशोत्सवासाठी सात हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. विसर्जनासाठी आणखी बळ वाढवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 4 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 10 पोलिस उपायुक्त, 23 सहायक पोलिस आयुक्त, 128 पोलिस निरीक्षक, 568 सहायक पोलिस निरीक्षक, 4604 अंमलदार, 1100 होमगार्ड, एस आर पी एफ ची एक कंपनी आणि क्युआरटीच्या दहा टीम तैनात असतील.
आणखी कोण-कोणते नियम लागू?
गणेशोत्सवासाठी 1742 लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात पेट्रोल, डिझेल सारख्या ज्वालाग्रही पदार्थांचा देखाव्यासाठी, आगीचा लोळ निर्माण करण्यासाठी उपयोग करण्यास मनाई करण्यात आली आहे. स्पीकर्सच्या आवाजावर मर्यादा राहावी यासाठी नियमांचे पालन केले जाणार आहे. 12 तारखेपासून 17 तारीख असे एकूण सहा दिवस सकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत लाऊड स्पीकर्सला परवानगी असणार आहे. फटाके वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात काही भागातील दारुची दुकाने बंद राहणार आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील तर अनेक रस्ते अवजड वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत, गरज पडल्यास ऐनवेळी वाहतूकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी यावेळी दिली आहे.
गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाणार
पुण्यातील गुन्हेगारांना कोयते मिळणार नाही यासाठी पावलं उचलली जाणार आहेत, अंमली पदार्थ विरोधी कारवाई साठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपुर्वी शहरातील सर्व गुंडाची धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर काही काळ शांतता होती, मात्र पुन्हा एकदा गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. सर्व गुंडांची पुणे पोलिसांनी धींड काढली होती. ज्यामध्ये गुंड गजानन मारणेचा समावेश होता. त्यानंतर त्याची वागणूक सुधारली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दलचे रिल्स सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहेत. याबद्दल लवकरच कडक कारवाई करु असंही आयुक्तांनी म्हटलं आहे.
पोर्शे कार प्रकरणात चौकशीत ज्यांची नावे येतील त्यांची नावे पुरवणी आरोपपत्रात दाखल
पोर्शे कार प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या अनेकांची चौकशी झाली आहे. यामध्ये आमदार सुनील टिंगरे यांची देखील चौकशी झाली आहे. नंतरच्या चौकशीत ज्यांची नावे येतील त्यांची नावे पुरवणी आरोपपत्रात दाखल करण्यात येतील, अशी माहिती यावेळी आयुक्तांनी दिली आहे.