(Source: ECI/ABP News/ABP Majha)
vijay Wadettiwar On Pune Traffic : पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण; सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; विजय वडेट्टीवारांचा आरोप
पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुणे : पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस (Pune News) बिकट होत चालला आहे. मेट्रोची नियोजन शून्य कामे, ढिसाळ नियोजन यामुळे (Pune Traffic) पुणेकर हैराण आहेत. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी अक्षरशः रडतायत याला जबाबदार मेट्रो आणि पालिका प्रशासन आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाला तात्काळ वठणीवर आणले पाहिजे. पालिका प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन करावे. अन्यथा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर चुकण्याचा घटना पुन्हा घडतील. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कळीचा मुद्दा आहे. पुण्यात विकासाच्या बाता मारणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहोचणार कसे? हा पुण्यातील पालकांच्यासमोर प्रश्न आहे. रिक्षा, ओला, उबेरने परीक्षेला जाणे सर्वांना परवडणारे नाही.
वडेट्टीवार म्हणाले की, शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान आचार्य आनंदऋषीजी चौकात तसेच पाषाण, औंध, बाणेरकडे जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे नियोजनबद्ध पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. महापालिका प्रशासन नागरिकांकडून कोट्यवधींचा कर वसूल करते, मग चांगले रस्ते, पायाभूत सुविधा उपलब्ध करून का देत नाही? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत
वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात सातवा क्रमांक आहे. टॉम टॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, शहरात सुरू असलेली नियोजनशून्य विकास कामे, ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत. पण पुण्यातील सत्ताधारी व्हिआयपींच्या गाड्यांना वेगळा मार्ग आरक्षित असल्याने त्यांना जनतेचा त्रास दिसत नाही ही वस्तुस्थिती असल्याचं ते म्हणाले.
पुण्यानं दिल्लीला मागे टाकलं
पुण्यातील वाहतूक कोंडीने मुंबई, दिल्लीलाही मागे टाकलेय. जगभरातील 387 शहरांतील वाहतूक कोंडीबाबतचा एम्स्टर्डमच्या टॉमटॉमने एक रिपोर्ट जारी केला. त्या रिपोर्ट्सनुसार, जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात पुणे सातव्या क्रमांकावर आहे. तर भारतातील दुसरे शहर ठरलेय. पुण्याने मुंबई आणि दिल्ली या शहरांना मागे टाकलेय. एम्स्टर्डमच्या टॉमटॉम कंपनीने जगातील 387 शहराच्या वाहतूक कोंडीचा रिपोर्ट जारी केलाय. 2023 च्या या रिपोर्ट्सनुसार, लंडनमध्ये जगभरात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते. आयरलँडमधील डबलिन दुसऱ्या तर टोरंटो तिसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप 10 शहरांमध्ये भारतातील दोन शहरांचा (बेंगलोर आणि पुणे) क्रमांक लागतो. बंगळुरु भारतातील पहिले तर जगभरातील सहावे वाहतूक कोंडी होणारं शहर आहे. या यादीमध्ये पुणे सातव्या क्रमांकावर आहे.
इतर महत्वाची बातमी-
Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या