Bhide Wada : मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक उभं राहण्याचा मार्ग मोकळा; भिडे वाड्यात पुन्हा मुलींची शाळा भरणार!
भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक उभं राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . कारण पुण्यातील भिडे वाड्याच्या तळाशी असलेली अतिक्रमणं पुणे महापालिकेकडून रातोरात हटवण्यात आलं आहे .
पुणे : भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक उभं राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . कारण पुण्यातील भिडे वाड्याच्या तळाशी असलेली अतिक्रमणं (Bhide wada) पुणे महापालिकेकडून रातोरात हटवण्यात आलं आहे . सोमवारी (4 डिसेंबर) रात्री पोलिसांच्या बंदोबस्तात ही अतिक्रमणं हटवून भिडे वाड्याची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळं लवकरच या ठिकाणी सावित्रीबाईंनी चालवलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या आठवणी जिवंत होणार आहेत .
स्त्री शिक्षणाची जिथून सुरुवात झाली त्या भिडे वाड्याचा इतिहास आता पुन्हा जिवंत होणार आहे. 1 जानेवारी 1848 साली सावित्रीबाईंनी जोतिबा फुलेंच्या साहाय्याने मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात केली. चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेल्या मुली शिकायला लागल्या आणि आणि देशात एका क्रांतीला सुरुवात झाली. आज आपण प्रत्येक क्षेत्रात महिला भरारी घेताना पाहतो. त्या भरारीला पंख फुटले ते खऱ्या अर्थानं या भिडे वाड्यात. जेव्हा इथं शाळा चालवली जायची तेव्हा हा वाडा भिडे नावाच्या गृहस्थांच्या ताब्यात होता. पण काळाच्या ओघात या भिडे वाड्याचे मालक बदलत गेले आणि या वाड्याची पुरती वाताहत झाली. अनेक मालकांच्या ताब्यातून हा भिडे वाडा अक्षरश: जीर्ण अवस्थेला पोहचला.
भरपूर प्रयत्नानंतर भिडे वाड्याचं अतिक्रमण हटवलं!
2008 साली हा वाडा पाडून इथं स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला. मात्र काळाच्या ओघात इथं भाडेकरू म्हणून दुकाने चालवणाऱ्या दुकानदारांनी इथून हटण्यास नकार दिला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अखेर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात मध्यरात्री इथली अतिक्रमणं काढण्यात आली आणि जिरणावस्थेत असलेले या वाड्याचे अवशेष पाडण्यात आले.
पुन्हा मुलींची शाळा भरणार!
तब्ब्ल तेरा वर्ष न्यायालयीन लढाई लढल्यानंतर वाड्याची ही जागा स्वतःकडे घेण्यात महापालिकेला यश आलंय. आता या ठिकाणी सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळात उभारलेल्या त्या पहिल्या शाळेचे स्मारक उभारण्यात येणार आहे. फुले दांपत्यानं शाळा सुरु केली तो काळ , त्यासाठी त्यांना सोसाव्या लागलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात हा सगळा इतिहास स्मारकाच्या रूपात उभारण्यात येणार आहे . त्याचबरोबर पुणे महापालिकेकडून मुलींसाठी शाळा देखील इथं चालवली जाणार आहे .
भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक बनवण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं त्याचे परिणाम आणि पडसाद राज्यात सध्या सुरु निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर देखील होणार आहेत . मात्र फुले दांपत्याचं कार्याला संकुचित राजकारणाच्या मर्यादा घालता येणं अशक्य आहे . संपूर्ण देशाला स्त्री शिक्षणाचा वारसा देणारं त्यांचं कार्य इथे शिल्प आणि स्मारकाच्या रूपात उभारणं हेच त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त, मोठ्या पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री पोलिसांनी घेतला ताबा