Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर सातत्याने अपघात का होतात? कोणाच्या चुकीमुळे अपघाताला आमंत्रण?
2014 पासून आतापर्यंत दरी पूल - नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 185 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे 66 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत.
Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या आणखी एका अपघातात 24 वाहनांचं नुकसान झालं आहे तर 13 जण जखमी झाले आहेत. दरी पूल ते नवले पूल या फक्त साडे तीन किलोमीटरच्या अंतरात 2014 पासून 185 गंभीर अपघात झाले असून 66 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. महामार्गाची चुकलेली रचना हे या अपघाताचं मुख्य कारण आहे. त्यासंदर्भात आतापर्यंत एनएचएआयने काढता पाय घेतला होता. मात्र कालच्या भीषण अपघातानंतर त्यांनी देखील महामार्गाची रचना चुकलेली असल्याचं मान्य केलं आहे.
बंगलोरहून- पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कात्रजचा नवीन बोगदा आहे. हा बोगदा ओलांडला की नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. या उतारामुळे चालकाचं ट्रक किंवा गाडीवरील नियंत्रण सुटतं. नियंत्रण सुटल्याने आणि न्यूट्रलवर ट्रक असल्याने कालचा भीषण अपघात घडला. या अपघातात एक दोन नाही तर तब्बल 24 वाहनांचं नुकसान झालं. सगळी वाहनं चक्काचूर झालेत.
"नशीब बलवत्तर म्हणून वाचलो"
या अपघातात 24 कार चक्काचूर झाल्या. या कारची अवस्था पाहून एकही व्यक्ती जीवंत राहणार नाही असा अंदाज येतो. मात्र आतापर्यंत या अपघात सुदैवाने एकाचाही मृत्यू झाला नाही. या अपघातातून वाचलेल्या चालकाने अपघाताची आपबीती सांगितली. माझ्या गाडीचं पूर्ण नुकसान झालं आहे. पण फक्त नशीब बलवत्तर म्हणून आम्ही या अपघातातून वाचलो आहोत. आम्हाला पुनर्जन्म झाला,असंच वाटत आहे, असं चालकांने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
नवले पुलानं घेतला 66 जणांचा जीव
नवले पुलावर अशाप्रकारचा भीषण अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. 2014 पासून आतापर्यंत दरी पुल ते नवले पुल आणि धायरी पुल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 185 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे 66 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत.
महापालिकेने फूटपाथ, सर्व्हिस रोड बांधावे; सुप्रिया सुळे
नवले पुलावरील अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्यांनी पुण्यातील नवले पुलावरील अपघातस्थळाची सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रस्त्याची रचना, महापालिकेकडून फूटपाथ, सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.
अपघातांची काही प्रमुख कारणं कोणती?
-कात्रजच्या नवीन बोगद्यातून धायरी पुलापर्यंत महामार्गाला तीव्र उतार आहे. यामुळे अनेकदा वाहनचालकांचं नियंत्रण सुटतं. - एनएचएआय आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामधे झालेल्या करारानुसार पुणे- ते सातारा दरम्यानच्या महामार्गाचं सहापदरीकरण मार्च 2013 मधे पुर्ण होणं अपेक्षित होतं. हे सहापदरीकरण रखडल्याने महामार्ग अरुंद होणं अपघातांना निमंत्रण देणारं ठरत आहे. -वाहनांच्या वेगावर नियंत्रण रहावं, यासाठी दरी पुलाजवळ लावलेल्या स्पीड गनमुळे काही वाहनांचा वेग अचानक कमी होत आहे. मात्र मागून वेगाने येणारी वाहनं वेग कमी झालेल्या वाहनांवर येऊन आदळतात. त्यामुळे अपघात होतात.