Pune Moshi Toll Plaza : पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आणखी चाप बसणार; टोल नाका पुन्हा सुरू
पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. कारण या मार्गावरील पिंपरी चिंचवडमधील मोशी टोल नाका आता पुन्हा सुरू होणार आहे.
Pune Moshi Toll Plaza: पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. कारण या मार्गावरील पिंपरी चिंचवडमधील मोशी टोल नाका आता पुन्हा सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने संपूर्ण तयारी केलेली आहे. बांधकाम विभागाने 8 ऑक्टोबर 2021 ला टोल नाका बंद केल्याचं जाहीर केलं होतं. परंतु आता केंद्राने 5 जानेवारीपासून टोल वसुली पुन्हा सुरु करण्याच्या सूचना दिल्याचं, राज्य महामार्ग विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशीचा टोल नाका बंद झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्गाकडे सोपवण्यात आली होती. मात्र 5 जानेवारीपासून पुन्हा हा टोलनाका सुरु असल्याचं घोषित केलं आहे. या निर्णयाला नागरिकांनी आणि सर्वपक्षीन नेत्यांनी टोलवसुली करु नका, अशी मागणी केली होती. त्यामुळे अजूनही या टोल नाक्यावर टोल वसुलीला सुरुवात झाली नाही.
टोल नाका चकाचक केला
5 तारखेपासून टोल नाका सुरु करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्गाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील सगळे प्राथमिक कामं पूर्ण केले आहे. सीसीटीव्हीपासून तर स्वच्छतेपर्यंत सगळी कामं पूर्ण झाली आहे. काही नवीन तंत्रज्ञानही याठिकाणी लावण्यात आले आहेत. संगणकदेखील बसवण्यात आले आहेत. ही सगळी तयारी पाहता. टोलवसुली कधीही सुरु होण्याची शक्यता आहे.
केंद्रसरकारचा आदेश
या महामार्गाच्या मेंन्टनन्सच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील टोल आकारणी पुन्हा एकदा सुरु करावी, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे टोल आकारणी सुरु करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्गाकडून घेण्यात आला आहे. हा मार्ग सहा पदरी करण्यासाठी आणि हस्तांतरणाच्या कारणावरुन या टोल नाक्यावरची टोल आकारणी बंद करण्यात आली होती, अशी महितीदेखील त्यांच्याकडून देण्यात आली आहे. सुरेंदर शुक्ला यांच्या कंपनीच्या मार्फत टोलवसुली करण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय महामार्गा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
टोलचे नवे दर किती?
मोशी टोल नाका सुरु झाल्यावर टोलचे नवे दर हलक्या वाहनापासून ते अवजड वाहनापर्यंत 15 रुपयांपासून ते 105 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत. ऑक्टोंबर 2021पूर्वी या टोलनाक्यावर 37 रुपये ते 270 रुपयांच्या दरम्यान टोल होते. मात्र आता 60 टक्के कमी दराने हा टोल आकारला जाणार आहे. त्यामुळे पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.