Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार अन् पुणेकरच जिंकणार; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रवींद्र धंगेकरांची डरकाळी!
पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
पुणे : पुणे लोकसभेचे (Pune loksabha Election)महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी ते पुण्यातील दगडूशेठ मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. मी पुणेकरांसाठी मत मागणार आहे, पुणेकरांचा हक्काचा उमेदवार आहे आणि पुणेकरच जिंकणार आहे, असा विश्वास एबीपी माझाशी बोलताना रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केला आहे.
रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?
रवींद्र धंगेकर म्हणाले की, आज सगळ्यात मोठा दिवस आहे. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांला कॉंग्रेसने मोठी संधी दिली आहे. त्यामुळे येणारा काळ रवींद्र धंगेकरचा असेल. मी पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकरांसाठी मत मागत आहे आणि पुणेकरच जिंकणार आहेत.
'मागील 30 वर्षांपासून पुण्याचं राजकारण जवळून पाहिलं आहे. नगरसेवकापासून तर लोकसभेच्या निवडणुकीप्रर्यंत कशाप्रकारे विरोधक यंत्रणेचा वापर करतात हे पाहिलं आहे. त्यामुळे वेळ आली की खुल्या मनाने कोणाला किती मतं पडणार हे सांगेन. विरोधकांचे सगळे प्रयोग माझ्या डोळ्यासमोर झाले आहे. त्याचे हे प्रयोग कसे बंद करायचे हे मला माहिती आहे', असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला आहे.
कसा असेल महाविकास आघाडीचा कार्यक्रम?
सकाळी 10:30 वाजता : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार
सकाळी 11 वाजता : विभागीय आयुक्त कार्यालय येथे सुप्रियासुळे यांचा अर्ज दाखल करण्यात येणार
सकाळी 11:30 वाजता : डॉ. अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर यांचा अर्ज दाखल करण्यात येणार.
सकाळी 11:45 वाजता : हॉटेल शांताई समोर, रास्ता पेठ येथे महाविकास आघाडी तथा इंडिया फ्रंटची भव्य सभा होणार
मोठं शक्तीप्रदर्शन होणार
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून झाल्यानंतर रास्ता पेठेमध्ये शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीची प्रचार सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते याप्रसंगी उपस्थित असणार आहेत. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडी मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे.
इतर महत्वाची बातमी-