Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत.
पुणे : पुण्यात गॅस चोरीच्या घटना काही नवीन नाही. आतापर्यंत (Pune gas cylinder Blast) अनेकदा अशा घटना समोर आल्या आहे. परिणामी या घटनांमुळे अनेकांना चापदेखील देण्यात आला आहे. मात्र तरीही गॅस चोरी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.
या गॅसच्या स्फोटात सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हा गोरखधंदा एका ढाब्याच्या (छोटं हॉटेल) समोर सुरू होता. एका कंटेनर मधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं. अशात गॅसचा स्फोट झाला, तीन ते चार टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आहेत. या स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत ढाब्यासह तिथं पार्क असणाऱ्या इतर वाहनांना ही मोठी आग लागली. तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे ही नुकसान झाले आहे. शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. चाकण पोलीस घटनेचा तपास करत आहे.
गेल्या वर्षी अशीच धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये ही घडली होती. टँकरमधून गॅस चोरी करताना नऊ टाक्यांचा स्फोट झाला होता. तीन स्कूल बसेस जळून खाक झाल्या होत्या. या घटनेनं अख्ख शहर हादरून गेलं होतं, स्थानिक नागरिक तर भीतीपोटी अक्षरशः घर सोडून बाहेर पडले होते. अग्निशमन दलाने तासाभरात परिस्थिती नियंत्रणात आणली आणि भीषण आगीमागे गॅस चोरीचा गोरखधंदा कारणीभूत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. या गोरखधंद्याला आणि भीषण आगीला पोलिसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संतापलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता.
या घटनेनंतर आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. गॅस चोरांचा हा गोरखधंदा थांबवायचं नाव घेत नाही आहे. मात्र गोरखधंद्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा गॅस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.