Pune Crime News : ज्वेलर्सवर मालकावर चाकूने हल्ला केला अन् चप्पल तिथेच विसरला, पोलिसांनी आरोपीला गाठलं, 'त्या' रात्री पुण्यात नेमकं काय घडलं?
कॅम्प परिसरातील भोपळे चौकाजवळ शनिवारी रात्री एका ज्वेलर्सवर मालकावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. घटनास्थळी सोडलेल्या चप्पलच्या साहाय्याने पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली.
पुणे : कॅम्प परिसरातील भोपळे चौकाजवळ (Pune Crime News) शनिवारी रात्री एका ज्वेलर्सवर मालकावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून दोन हल्लेखोर ज्वेलर्स मालकाचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. घटनास्थळी सोडलेल्या चप्पलच्या साहाय्याने पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली.
मेहता ज्वेलर्सचे विजय मेहता असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ज्वेलर्स मालकाचं नाव असून रात्री उशिरा लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्पच्या सेंटर स्ट्रीट भागात दागिन्यांचा व्यवसाय करणारे मेहता शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घरी परतण्यासाठी दुकानातून बाहेर पडले. याच प्रवासादरम्यान त्यांच्यावर कोयता हल्लेखोरांनी हल्ला केला. मेहता रस्त्यावर पडले आणि त्यानंतर हल्लेखोरांनी पाठलाग करत जवळच्या गल्लीत पळून जाण्यात यश मिळवलं.
सेंटर स्ट्रीटवरील मार्केटमध्ये एका सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मेहता यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावर सापडलेल्या चप्पलच्या ओळखीच्या आधारे पोलिसांनी हडपसर येथील युवराज घोडके या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. घोडके यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओही पोस्ट केला होता, ज्यात हीच चप्पल दिसत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, ज्वेलर्स मालक मेहता यांनी आपल्या आईवर चोरीचा आरोप केला होता, त्यामुळे तिला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. हा खोटा आरोप असल्याचा त्याचा दावा असून या घटनेने व्यथित झालेली त्याची आई खूप रडली. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने सूड घेण्याचा प्रयत्न केला. आरोपींवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याने त्याच्या नोंदी पोलीस तपासत आहोत. पुढील तपास सुरू आहे.
दहशत कधी थांबणार?
काही दिवसांपूर्वी हॉटेलच्या बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर थेट कोयता उगारला होता. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली होती. सध्या पुण्यात अनेक ठिकाणी कोयत्या गँगने दहशत माजवल्याचं मागील काही महिन्यांपासून दिसत आहे. या प्रकरणात तीन जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-