Pune Accident: संसाराची वेल बहरण्यापूर्वीच घात झाला; पुण्यात गणरायाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्याला भरधाव डंपरनं उडवलं
Pune Accident: गणपतीचं दर्शन घेऊन घरी परत जात असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिली.
पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच काल (गुरूवारी) मुळशी तालुक्यात पुन्हा एक हिट अँड रनचं (Pune Accident) प्रकरण समोर आलं आहे. गणपतीचं दर्शन घेऊन घरी परत जात असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिली. या घटनेत दोघां पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण घटनेत अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम परिसराजवळ हा भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. घटनेनंतर डंपर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. त्याच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सूर्यवंशी आणि प्रिया सूर्यवंशी यांचं आठच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अशातच ही घटना घडल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सूर्यवंशी आणि प्रिया सूर्यवंशी हे दोघे रात्री उशिरा गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या दुचाकीवरून भूगाववरून भुकूमकडे परतत होते. त्याचवेळी एक डंपर चालक भरधाव वेगाने जात होता. या डंपरने सूर्यवंशीच्या दुचाकीला जोरात धडक दिली. पती-पत्नी दोघेही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. डंपर चालकाने या घटनेनंतर घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. त्यामुळे या पती-पत्नींना उपचार न मिळाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर वाढत्या अपघाताच्या (Pune Accident) घटना पाहून आणि वाहन चालवताना केले जाणारे नियमांचे उल्लंघन यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या अपघात प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक झाली नसल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या आरोपीचा अजूनही शोध सुरू आहे..