Pune Rains: मुसळधार पावसाने पुण्यातील रस्त्यांवर 'नदी'; नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप
Pune Rains: पुण्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर शहर नियोजनाच्या मर्यादा उघड झाल्या. पावसाने हाल झाल्याने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Pune Rains: सोमवारी रात्रीपासून पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Pune heavy Rains) रस्त्यांचे रुपांतर नद्यांमध्ये झाले. अनेक घरे, दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. मुसळधार पावसाने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे आणखीच हाल झाले. पुण्यात मुसळधार पावसाने दारोदारी झालेल्या 'जलयुक्त शिवारा'साठी कोण जबाबदार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत.
राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. या परतीच्या पावसाने पुण्यालाही तडाखा दिला. शिवाजी नगर परिसरात रात्री साडे अकरा वाजेपर्यंत 81 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्याच वेळेस या पावसाने स्मार्ट सिटी पुणेच्या शहर नियोजनाच्या मर्यादा उघडकीस आणल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात काही ठिकाणी पाणी साचले होते. मात्र, सोमवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदीर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रस्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ, डॉल्फिन चौक, बी.टी. कवडे रोड अग्निशमन केंद्र परिसर, हडपसर परिसरात पाणी साचले होते.
काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांसमोर मध्यरात्री पर्यायी व्यवस्था करण्याचे आव्हान निर्माण झाले. तर, काही भागांमध्ये दुचाकींसह कार पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे वाहनधारकांना आता मोठा फटका बसला आहे.
जबाबदार कोण?
पुण्यात झालेल्या या पावसाने शहर नियोजनाच्या मर्यादा उघड झाल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट सिटी असणाऱ्या पुणे शहराची अशी दयनीय अवस्था का, असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. पुण्यात नवीन बांधकाम उभारण्यासाठी नदी पात्र बुजवणे, टेकडी तोडणे, ओढे बुझवणे आदी कामे करण्यात आली. त्याचा परिणाम पावसात दिसून आला. पर्यावरणाचा ऱ्हास करून केलेल्या कथित विकासाची किंमत मोजावी लागत असल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली आहे. पुण्यात ही स्थिती ओढावू नये यासाठी ठोस पावले उचलण्यात यावी अशी अपेक्षाही पुणेकरांनी व्यक्त केली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
मुसळधार पावसानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता असल्याने पुण्याच्या या वाताहातीसाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू करण्यात आला. तर, भाजपने ही रखडलेल्या प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. मेट्रो आणि पुण्यातील इतर प्रकल्प रखडल्याने ही स्थिती झाली असलयाचे आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
