Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणपती वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला दमदाटी करुन मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल
Pune Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला दमदाटी करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला दमदाटी करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील (Pune) लोणी काळभोर परिसरात रविवारी (10 सप्टेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी दिनेश भिकाराम गोरा यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे 2 आणि अष्टविनायक मित्र मंडळाचे 2 अशा चौघांवर प्रथम खबरी अहवालाची नोंद केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश गोरा यांचे लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी किराणा स्टोअर्स नावाने किराणा दुकान आहे. मागील तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक मंडळाच्या काही तरुणांनी गोरा यांना तीन हजार रुपयांची वर्गणीची पावती दिली होती. यावेळी रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 तरुणांचा घोळका हा वर्गणी मागण्यासाठी किराणा दुकानात आला. यावेळी गोरा यांनी एवढी रक्कम देऊ शकत नसून तुम्ही काहीतरी कमी करुन घ्या असे म्हणाले. यावेळी यातील एकाने त्याच्या कानाखाली मारली. पाठीमागे असलेल्या काही तरुणांनी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करुन दमदाटी केली. तसेच पुन्हा दुकानात घुसून मारहाण केली.
वर्गणी दिली नाही म्हणून बांबूने मारहाण
काही दिवसांपूर्वी (4 सप्टेंबर) असाच प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील सेवक वसाहतीमध्ये घडला होता. गणपतीसाठी वर्गणी दिली नाही म्हणून तिघांनी मिळून एका व्यक्तीला लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना घडली होती. कृष्णा तांबोळी असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनेश वाल्मिकी, प्रतिक मल्हारी आणि उमेश अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावं आहे. दिनेश आणि प्रतिक यांनी कृष्णा तांबोळी यांच्याकडे गणपतीसाठी वर्गणी मागितली होती. परंतु आपण मोठ्या मंडळासाठी वर्गणी दिली असून तुमच्या मंडळासाठी वर्गणी देणार नाही, असं सांगितलं. याचा राग आल्याने दिनेश आणि प्रतिकने त्यांना बांबूने मारहाण केली.
हेही वाचा