Ganapati Visarjan : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन, पुणेकरांची मोठी गर्दी
Pune Ganapati Visarjan 2022 : पुण्यातील पाचव्या मानाच्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झालं आहे.
पुणे : पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्याचसोबत मानाच्या पाचही गणपतींचे (Pune Ganeshotsav 2022) परंपरेनुसार विसर्जन झाले. डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही गणपतींचे विसर्जन करण्यात आलं असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.
पुण्याच्या मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं 4.15 मिनीटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी 5.30 वाजता झालं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन हे 7.22 मिनीटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन रात्री 8.02 वाजता झालं.
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन रात्री 8.50 मिनीटांनी करण्यात आलं. पुण्यातील पाचही गणपतींचे विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आलं आहे. यावेळी लेझिम अन् ढोल-ताशाच्या गजरात अवघं पुणे दुमदुमल्याचं दिसून आलं.
पुणे पालिकेने बांधलेल्या डेक्कन येथील हौदात या मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आलं. पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती. या गणपतींच्या विसर्जनाचा कार्यक्रम क्रमाने आखण्यात आला होता.
पाचव्या मानाच्या गणपती आधीच इतर दोन गणपतींचे विसर्जन
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत यावर्षी वेगळे चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील प्रथेप्रमाणे पाच मानाच्या गणपतींचे क्रमानुसार विसर्जन होते. चौथ्या मानाच्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पाचव्या मानाच्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन होणे अपेक्षित होते. परंतु केसरीवाडा गणपती अलका चौकात येण्यास उशीर झाल्याने केळकर रस्त्यावरून आलेल्या इतर मंडळांना पुढे जाऊ देण्यात आले. महापालिकेचा गणपती आणि अनंत गणेश मंडळ या दोन मंडळांच्या गणपतीचे विसर्जन केसरीवाडा गणपतीच्या आधी झालं आहे.
मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाची वेळ
कसबा गणपती
बेलबाग चौक - 11:20
अलका चौक - 3:15
विसर्जन - 4:15
तांबडी जोगेश्वरी
बेलबाग चौक - 11:55
अलका चौक - 4:45
विसर्जन - 5:38
गुरुजी तालीम
बेलबाग - 1:30
अलका चौक - 6:15
विसर्जन - 7.22
तुळशीबाग
बेलबाग चौक - 3:30
अलका चौक - 7:30
विसर्जन - 8.02 मिनिटे
केसरी वाडा
बेलबाग चौक - 3:45
विसर्जन - 8.50