(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : कुत्र्यावरुन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी, वाद पोलीस ठाण्यात अन् तरुणीचा पोलिसांसमोरच गोंधळ
पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणीने आणि तिच्या आईने गोंधळ घालत पोलिसांनाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे : कुत्र्याने घरासमोर घाण केल्याने पुण्यातील कर्वेनगर भागातील दोन शेजाऱ्यांमधे सुरु झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोन्ही शेजाऱ्यांच्या एकमेकांविरुद्धच्या तक्रारी नोंद करुन घेतल्या. पण त्यानंतर देखील मृणाल पाटील नावाच्या तरुणीने कर्वेनगर पोलीस चौकीत प्रचंड गोंधळ घातला. एवढंच नाही तर पोलीस चौकीतील महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
पुण्याच्या कर्वेनगर भागातील गुरुप्रसाद कॉलनीत सुनिता दळवी आणि संजना पाटील या शेजारी शेजारी राहतात. दोघींच्या कुटुंबियांनी कुत्री पाळली असून ही कुत्री एकमेकांच्या दारांसमोर जाऊन घाण करत असल्याचा दोन्ही कुटुंबियांचा आरोप होता. या वादातून गुरुप्रसाद कॉलनीत राहणाऱ्या दळवी आणि पाटील कुटुंबात रविवारी दुपारी हाणामारी झाली.
संजना पाटील आणि त्यांची मुलगी मृणाल पाटील यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार सुनिता दळवी यांनी पोलीसांकडे दिली. त्यांच्यापाठोपाठ संजना पाटील आणि त्यांची मुलगी मृणाल पाटील या देखील पोलीस स्टेशनला पोहचल्या. पोलीसांनी त्यांचीही सुनिता दळवी यांच्या विरोधातील तक्रार नोंद करुन घेतली. मात्र त्यावेळी मृणाल पाटील या तरुणीचा कर्वेनगर पोलीस चौकीतील पोलीसांसोबत वाद सुरु झाला. या वादातून तिने पोलीसांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर पोलीस कर्मचारी सुषमा घोळवे यांच्या तक्रारीवरून मृणाल पाटील हीच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुलीने आणि तिच्या आईने पोलीस चौकीमध्ये घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र तरीही या मुलीला पोलिसांकडून अद्याप अटक का करण्यात येत नाही असा प्रश्न विचारण्यात येतोय. पोलिसांचं म्हणणं आहे की या तरुणीच्या शोधासाठी त्यांनी दोन पथकं तयार केली आहे आणि तिचा शोध सध्या सुरू आहे.
सामान्य माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढतो ती आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने. परंतु खुद्द पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण होत असेल आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडत असतील तर सामान्य जनतेचा पोलिसांवरचा विश्वास राहील का असा प्रश्न विचारला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा विळखा, दैनंदिन तपासणीतही आढळत आहेत रुग्ण
- पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून शिवसेना संपवण्याचं काम; शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटलांचा आरोप
- OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा डेटा कधीपर्यंत मिळणार? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती