Pune : टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात, तीन महिलांचा मृत्यू
Pune Daund Accident News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.
Pune Daund Accident News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दौंडमधील रावणगावमध्ये सायंकाळी पाच वाजता अपघात झालाय.
दौंड तालुक्यातील रावणगावमध्ये टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा सायंकाळी पाच वाजता अपघात झाला. यामध्ये पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तर तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊ पानसरे या दोन्ही सख्ख्या जावा आहेत व अश्विनी प्रमोद आटोळे ह्या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टोमॅटोचे 70 ते 80 क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या 32 व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. त्यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. त्यामध्ये नऊ महिला होत्या. रावणगाव परिसरातील या महिला होत्या. उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.
टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळापर्यंत पोहचेपर्यंत स्थानिकांनी तात्काळ ट्रॅक्टरमधून महिलांच्या अंगावर पडलेल्या क्रेट बाजूला करण्याचं काम केलं. स्थानिकांच्या मदतीमुळे महिलांचा जीव वाचला. जेसीबीच्या मदतीनं 32 व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून खाली गेलेल्या ट्रॅक्टरला काढण्यात आलं. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दौंड व भिगवण येथील दवाखान्यात जखमी महिलांवर उपचार सुरु आहेत. या अपघाताप्रकरणी पोलिस तपास करत असून गुन्हा नोंदवण्याचं काम सुरु आहे.
आणखी वाचा :
या 116 स्मार्टफोनमध्ये सपोर्ट करणार 5G,एअरटेलनं जारी केली यादी, यामध्ये तुमचा फोन आहे?