(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Mohol Murder Case : "गेम केला, मास्टरमाईंडला सांगा" गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपीचा फोन नेमका कोणाला?
Sharad Mohol : शरद मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. आरोपी खेड शिवापूर टोल नाक्यापुढे थांबल्यानंतर नातेवाईक त्यांना भेटायला आले होते.
पुणे : गँगस्टर शरद मोहोळचा दिवसाढवळ्या झालेला खून हा टोळीयुद्धातून झाला आहे का? याची चर्चा अजूनही सुरुच आहे. पोलिसांनी मोहोळच्या हत्याकांडानंतर आतापर्यंत 13 जणांना अटक केली असून 11 जणांना नव्याने नवी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 24 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, या प्रकरणात अजूनही दावा केला जात आहे. आरोपींनी शरदची हत्या केल्यानंतर फोनाफोनी करून सीमकार्ड बदलल्याचे सुद्धा पोलिस तपासात समोर आले आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपीचा फोन कोणाला?
आरोपींनी शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाने कोल्हापूरच्या दिशेने पळ काढला होता. आरोपींनी पळून गेल्यानंतर नवीन सीमकार्ड वरून फोनाफोनी केली होती. "गेम केला, मास्टरमाईंडला सांगा" असा आरोपींनी शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपीचा फोन कोणाला केला? याचा आता तपास सुरु आहे. शरद मोहोळच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेने नितीन खैरे, आदित्य गोळे आणि संतोष कुरपेला अटक केली आहे. या आरोपींनी मोहोळचा खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र खरेदी करण्यासाठी हल्लेखोरांना पैसे पुरविल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे.
मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. आरोपी खेड शिवापूर टोल नाक्यापुढे थांबल्यानंतर नातेवाईक त्यांना भेटायला आले होते. त्यावेळी आरोपीला एक नवीन सीमकार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सीमकार्ड काढून नवीन सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकले होते. यावेळी पहिला फोन संतोष कुरपेला केला होता. शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टरमाईंडला सांगा, असे संभाषण त्यांच्यात झाल्याची माहिती पुणए पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
गुंड विठ्ठल शेलारसह 11 जण ताब्यात, गुन्हे शाखेची रात्रभर कारवाई
दरम्यान, गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणी पुणे पोलिसांनी रविवारी (14 जानेवारी) रात्री मोठी कारवाई केली आहे. शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना ताब्यात घेतले. मागील दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलिस या आरोपींच्या मागावर होते. मात्र, ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या