पुण्यात नोकरी, जळगावच्या 24 वर्षीय तरुणीचा शिमल्यात दुर्दैवी अंत; मैत्रिणींसोबत गेली होती पर्यटनास
या भीषण अपघातात बसचा पुढचा भाग पूर्णतः चिरडला गेला. यात बसमध्ये बसलेल्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर किमान 15 पर्यटक जखमी झाले आहेत.

Jalgaon: हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक नद्यांना पूर आला आहे. या पावसामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशाच एका भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील एक तरुणी मृत्यूमुखी पडली आहे. शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसरात रविवारी एका पर्यटकांच्या बसवर दरड कोसळली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये जळगाव शहरातील लक्ष्मी रामचंद्र विराणी (वय 24) यांचा समावेश आहे.
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे डोंगरावरुन अचानक प्रचंड दगड खाली घसरले आणि थेट खाजगी बसवर कोसळले. या भीषण अपघातात बसचा पुढचा भाग पूर्णतः चिरडला गेला. यात बसमध्ये बसलेल्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर किमान 15 पर्यटक जखमी झाले आहेत.
तात्काळ बचावकार्य
अपघातानंतर पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना बाहेर काढून महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतदेह रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून नियमानुसार शवविच्छेदनानंतर जळगावच्या लक्ष्मी विराणी यांचा मृतदेह त्यांच्या कार्यालयीन सहकारी तरुण रामचंदानी यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल.घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन तसेच हिमाचल प्रदेश शासनाशी तातडीने संपर्क साधला. लक्ष्मी विराणी यांचा मृतदेह कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे.
पुण्यात नोकरी, फिरण्यासाठी गेली होती शिमला
लक्ष्मी विराणी ही पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत होती. कंपनीतील काही मैत्रिणींसह ती पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशात गेली होती. शिमला येथे फिरत असताना काल अचानक दरड कोसळून तिच्या बसवर मोठा दगडी ढिगारा कोसळला. या अपघातात बसचा मोठा भाग चिरडला गेला आणि क्षणात प्रवासी अडकले. जळगावमधील विराणी कुटुंबावर या घटनेनंतर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नोकरीसाठी पुण्यात राहणारी लक्ष्मी विराणी पर्यटनासाठी हिमाचलला गेली आणि दुर्दैवाने तिला जीव गमवावा लागला. तिच्या निधनाची बातमी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.























