Pune Crime : ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का? म्हणत आलिशान कार चालकाकडून वकिलाला मारहाण
Pune Crime : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एका वकिलाला आलिशान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला पत्ता विचारणं चांगलंच महागात पडलं आहे. पत्ता विचारल्याने ऑडी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने वकिलाला शिवीगाळ करुन मारहाण केली.

Pune Crime : पुण्यातील (Pune) जंगली महाराज रस्त्यावर (JM Road) एका वकिलाला (Advocate) आलिशान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला पत्ता विचारणं चांगलंच महागात पडलं आहे. ऑडी (Audi) चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का असं म्हणत आलिशान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने वकिलाला शिवीगाळ करुन मारहाण केली. जंगली महाराज रस्त्यावरील सुभद्रा हॉटेलच्या समोर हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणी वकील विशाल शंकर सोनवणे (वय 42 वर्षे, रा. धानोरी) यांनी डेक्कन पोलिसात (Deccan Police) तक्रार दिली आहे. त्यानुसार एमएच 14 आर एफ 6685 या ऑडी कार चालकाविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
पुण्याचील डेक्कन परिसरातील जंगली महाराज रस्त्यावर ही घटना घडली. तक्रारदार अॅड. विशाल सोनवणे काही कामानिमित्त तिथे आले होते. त्यावेळी सुभद्रा हॉटेल समोर ओळीत गाड्या थांबल्या होत्या. त्यातील ऑडी कार चालकाला वकील विशाल सोनवणे यांनी ज्ञानमुद्रा ट्युटोरियल क्लासचा पत्ता विचारला होता. परंतु ही बाब ऑडी कारच्या मालकाला रुचली नाही. आपल्याला पत्ता विचारल्याचा त्याचा प्रचंड राग आला. हाच राग मनात धरुन ऑडी चालकाने "तुम्हाला समजतं का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात, आम्ही ऑडी चालवणारे लोक आहोत" असं म्हणून त्याने विशाल सोनवणे यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. यामुळे विशाल सोनवणे खाली पडले. एवढ्यावरच ऑडी चालक थांबला नाही. त्याने त्यानंतर कार वेगाने घेऊन जात असताना गाडीचे चाक तक्रारदार वकिलाच्या पायावरुन गेलं. यामध्ये विशाल सोनवणे जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी डेक्कन पोलीस स्टेशन गाठत ऑडी चालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ
पुण्यात गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहे. क्षुल्लक कारणांमुळे वाद होऊन त्याचं हाणामारीत रुपांतर होण्याच्या घटना वाढत आहेत. दरम्यान, पुणे आणि पुणेकरांच्या सवयी, स्वभाव, तिथल रुटीन याबद्दल कायमच टीकाटिप्पणी केली जाते. एखाद्या गोष्टीबद्दल विचारल्यावर सरळ उत्तर न देणाऱ्याला 'टिपिकल पुणेरी' ही बिरुदावली दिली जाते. तुसेडपणामुळे किंवा फटकळ स्वभावामुळे पुणेकर कायमच अनेकांच्या निशाण्यावर येतात. त्यातच पत्ता विचारला म्हणून संतापलेल्या एका आलिशान कार चालकाने वकिलाला मारहाण केल्याची ताजी घटना पुण्यात घडली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
