Pune Crime : पुणे हादरलं! खडकीत तीन वर्षीय चिमुरडीचा खून करुन मृतदेह फेकला; गुन्हा दाखल
खडकी येथे तीन वर्षांच्या चिमुरडीचा खून करुन तिचा मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime : खडकी येथे तीन वर्षांच्या चिमुरडीचा (Murder) खून करुन मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची ओळख पटलेली नसली तरी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
खडकी रेल्वे स्थानक ते खडकीबाजारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडील सीएएफव्हीडी मैदानाजवळ मुलीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण छावणी परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्हेगाराच्या शोधासाठी खडकी पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेची पथके एकत्र आली आहेत.खडकी पोलिसांना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता पोलिस नियंत्रण कक्षाने माहिती दिली. घटनास्थळी आल्यानंतर मुलीचा गळा आवळून खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुन्हेगार अजूनही फरार आहे.
या दुःखद घटनेमुळे शहरातील लहान मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे निर्देश दिले आहेत. हत्येमागचा हेतू अद्याप अस्पष्ट असला तरी पोलिसांनी पीडितेची ओळख पटवण्यासाठी मदत करण्यासाठी कोणाला माहिती असेल त्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहे. त्यात अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं मुल टाकून देण्यापासून ते मुलांची हत्या करण्यापर्यंत गुन्ह्यांची मजल पोहचली आहे. यागुन्ह्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
लहान मुलांची सुरक्षा धोक्यात; दौंडमध्ये जिवंत बाळ फेकलेलं...
अशा घटना सातत्याने घडत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Daund) दौंड तालुक्यातील रावणगाव येथे एका तीन महिन्याच्या बाळाला (Baby) महामार्ग रस्त्याच्या आणि सर्व्हिस रोडच्यामध्ये असलेल्या चारीत टाकून दिल्याची घटना घडली होती. याबाबत अज्ञात पालक आणि आई-वडिलांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महामार्ग आणि सेवा रस्त्याच्यामध्ये एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज येत होता. शेतकरी पद्माकर कांबळे, ईश्वर रांधवन अनिकेत रांधवन, युवराज रांधवन यांनी बाळाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्याच दरम्यान त्यांना तीन महिन्याची मुलगी गुलाबी शालीत गुंडाळुन ठेवलेली दिसली. थंडी असल्याने ती जोरात रडत होती. या शेतकऱ्यांनी या बाळाच्या नातेवाईकांचा आजूबाजुच्या परीसरामध्ये खूप वेळ शोध घेतला आणि पोलिसांत तक्रार केली होती.