Pune Crime : सहकुटुंब जेवणासाठी बाहेर गेलं आणि चोरट्यांनी घरच साफ केलं; परकीय चलनासह हिरे, सोन्याचे दागिने लुटले
Pune Crime : पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या औंध भागात चोरीची घटना घडली. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरटे घरात घुसले आणि तब्बल 66 लाख रुपयांचा ऐवज लुटला.
Pune Crime : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. पुण्यातील (Pune) उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या औंध (Aundh) भागात चोरीची घटना घडली. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरटे घरात घुसले आणि तब्बल 66 लाख रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीने चतु:श्रुंगी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे. चोरी झालेल्या ऐवजामध्ये पाच लाख रुपयांचे परकीय चलन (Foreign Currency) तसंच हिरे (Diamond) आणि सोन्याचे दागिन्यांचा (Golden Jewellery) समावेश आहे.
जेवणासाठी बाहेर गेले आणि चोरट्यांनी घरच साफ केलं
चतु:श्रुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची पिंपरी-चिंचवड परिसरात पॅकिंग करणारी कंपनी आहे. औंध येथील सिंध हौसिंग सोसायटीमध्ये त्यांचा बंगला आहे. रविवारी (11 डिसेंबर) ते दुपारी दीडच्या सुमारास ते कुटुंबासाबोत जेवण्यासाठी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी डाव साधला. पाठीमागच्या दरवाजाने आत शिरुन घर साफ केलं. चोरट्यांनी परकीय चलन आणि डायमंड आणि सोन्याचे दागिने असा एकूण 66 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरु
दुपारी चार वाजता ते घरी परतले तेव्हा त्यावेळी त्यांना दरवाजा उघडला. यावेळी घरातील साहित्य आणि कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा सुरु केला. दरम्यान या बंगल्यात किंवा सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चतु:श्रुंगी पोलीस या भागातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध घेत आहेत.
महिनाभरापूर्वी घरफोडी करणारे हायप्रोफाईल बंटी-बबली अटकेत
पुण्यात महिनाभरापूर्वी हायप्रोफाईल चोरी करणाऱ्या बंटी-बबलीच्या जोडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या बंटी बबलीकडून तब्बल 1 कोटी 13 लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांना या बंटी-बबलीला अटक करण्यात यश आलं. राजू दुर्योधन काळमेध आणि त्याची मेहुणी सोनिया श्रीराम पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सोनिया ही बीए एलएलबीचं शिक्षण घेत होती तर राजू काळमेध याचा पुण्यात हॉटेलचा व्यावसाय आहे. आरोपींचे वडगाव, वाकड, नाशिक, शिर्डी या ठिकाणी फ्लॅट आहेत तर वाकड येथे हॉटेल आहे. तसेच नाशिक येथे फार्म हाऊस आणि पोल्ट्री व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे.