Pune Crime News : वडिलांनी पोटच्या 13 वर्षीय लेकीची हत्या केली अन् कालव्यात फेकून दिलं; पुण्यातील घटना
Pune Crime News: पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या करुन तिला कालव्यात फेकून दिल्याची घटना घडली आहे.
Pune Crime News : पुण्यात नात्याला काळीमा (Pune Crime News) फासणारी घटना समोर आली आहे. पोटच्या मुलीची हत्या करुन तिला कालव्यात फेकून दिल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शिंदे (36) असे आरोपीचे नाव असून तनुश्री शिंदे (13) असे मृत मुलीचं नाव आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या वडिलांनी हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. त्यानंतर वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजता घडली. वडील रिक्षाचालक आहेत. पत्नी वृषाली शिंदे हिच्यासोबतच्या ताणलेल्या संबंधांमुळे ते नाराज होते. मुलगी तिच्या आईसोबत राहिली आणि तिने काही दिवस वडिलांच्या घरी जाण्याचा आग्रह धरला होता. मुलीची हत्या केल्यानंतर शिंदे यांनी तनुश्रीला सारसबागजवळील कालव्यात ढकलून विष प्राशन केल्याची माहिती पत्नीला दिली. सध्या ते ससून जनरल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यानंतर पत्नी वृषालीने स्वारगेट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला, असे पोलिसांनी सांगितले. या दोघांचे13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि संदीपच्या मद्यपानाच्या सवयी आणि संशयामुळे त्यांचे संबंध ताणले गेले होते. वृषाली ब्युटी सलून चालवते. वृषाली महिन्याभरापासून तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिच्या वडिलांनी संदीपला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
दोन तासांत मुलीचा मृतदेह शोधला...
हत्येनंतर आरोपी वडिलांनी तनुश्रीचा मृतदेह वाहत्या कालव्यात फेकून दिला. माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन तासात पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेहाचा शोध लावला. मृत मुलीच्या वडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत. आईच्या तक्रारीवरुन वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
पुण्यात गुन्हेगारीत वाढ
पुण्यात सध्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहे. त्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणातदेखील वाढ झाली आहे. लैंगिक अत्याचार, बलात्कारांच्या संख्येत आणि त्यासोबतच सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी रोखणं सध्या पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.