(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune crime news : पाळीव कुत्र्याला दगड मारल्याच्या वादातून कुऱ्हाडीने वार; पुण्यातील घटना
पाळीव कुत्र्याला दगड मारल्याने झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाडीने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली आहे
Pune crime news : पाळीव कुत्र्याला दगड मारल्याने (Crime news) झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाडीने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी श्वानाच्या मालकास चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली. अयूब बाशा शेख असं 36 वर्षीय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखने केलेल्या हल्ल्यात 40 वर्षीय रवी घोरपडे गंभीर जखमी झाले आहेत. शेख बिगारी काम करतो. घोरपडे रंगारी आहे. दोघे शिंदे मळा भागातील वस्तीत राहायला असून, एकमेकांचे परिचित आहेत. घोरपडे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे मळा परिसरातून जात असताना शेखचा पाळीव कुत्रा घोरपडेवर भुंकला. घोरपडेने श्वानाला दगड मारला. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. शेखने घोरपडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. शेखने केलेल्या हल्ल्यात घोरपडे गंभीर जखमी झाले आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेखला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या सगळ्या घटनेचा पोलीस तपास करत आहे.
प्राण्यावरुन वाद
याआधी बकरी दारात बांधली आणि तिच्या आवाजाचा त्रास होत आहे. या कारणावरुन बकरी मालकाने मारहाण केली होती. हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात गेला होता. तक्रारदार आणि अल्पवयीन मुलामध्ये वाद झाला हा वाद टोकाला गेला. त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारदार आणि अल्पवयीन मुलगा खडकी परिसरात एकमेकांच्या शेजारी राहतात. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
याबाबत एका शिवाजीनगर येथील महात्मा गांधी वसाहतीत राहणार्या एका 35 वर्षीय युवकाने खडकी पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली होती. अल्पवयीन मुलगा तक्रारदाराच्या घराच्या समोर बकरी बांधत होता. या बकरीचा आणि तिच्या आवाजाचा त्रास व्हायचा. त्यामुळे तक्रारदाराने अल्पवयीन मुलाला बकरी घरापुढे का बांधली असा जाब विचारला. यातून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मारहाण देखील झाली. मारहाणीनंतर त्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार अति वाढत गेल्याने युवकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ठाण्यात बोलवले त्यांची समजूत काढली. बकरीमुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली होती. या घडलेल्या प्रकरामुळे पुणेकरांवर चक्क डोक्यावर हात मारायची वेळ आली होती.