(Source: Poll of Polls)
Pune Crime : पुणे हादरलं! सहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
Pune Crime News : पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कोरोगाव भीमामध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला
Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचं (Pune Crime) प्रमाण वाढत आहे. त्यात लैंगिक अत्याचारांच्या (Rape) घटनांमध्येही वाढ होत आहे. अशीच संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कोरोगाव भीमामध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आला आहे. त्यात संतापजनक बाब म्हणजे मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आल्याने सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात युवकावर बाल लैंगिक अत्याचारासह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीडित विद्यार्थिनीच्या अचानक पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी गावातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी पीडित विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यावेळी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना हादरा बसला. या विद्यार्थिनीवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. विद्यार्थिनीच्या आईसह अन्य नातेवाईकांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता, घरा शेजारील राहणाऱ्या एका तरुणाने दुकानातून घरी जाताना घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि जर या संदर्भात कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली,असं विद्यार्थिनीने आईला सांगितले."
त्यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या आईने तात्काळ शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले. अज्ञात तरुणाच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसानी अज्ञात तरुणावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
डिसेंबर महिन्यातही असाच प्रकार समोर
बाल विवाह करणे हा गुन्हा असतानादेखील बालविवाह करुन दिल्याने 12 वर्षीय मुलगी गर्भवती राहिती होती. पुण्यातील चाकण परिसरातून ही घटना समोर आली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या पतीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मे 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत खेड तालुक्यात घडलं होतं. या संदर्भात महिला कर्मचाऱ्याने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पीडित मुलीचा पती राहुल शिवाजी भले यांच्यावर पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नराधमांना शिक्षा कधी होणार?
मागील काही दिवसांपासून या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. या घटनांमुळे नगराधमांना योग्य शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पालक करताना दिसत आहेच. या नराधमांना शिक्षा कधी होणार, असे प्रश्नदेखील उपस्थित केले जात आहेत.