Nagpur News : बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महागड्या कारची 'हाय-टेक चोरी', आंतरराज्यीय मोठ्या टोळीचा पर्दाफाश
Nagpur News : बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महागड्या कारची ओरिजिनल किल्ली डीऍक्टिव्हेट करून नवी किल्ली ऍक्टिव्हेट करणाऱ्या आणि कार चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी केला आहे.
Nagpur Crime News : ऑटोमोबाईल कंपन्यांच्या सॉफ्टवेअर सारखे बनावट सॉफ्टवेअर तयार करून त्याच्या मदतीने महागड्या कार चोरी करण्याचे नवे धक्कादायक तंत्र अमलात आणले आहे. मात्र नागपूर पोलिसांनी त्यासंदर्भात बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महागड्या कारची बनावट किल्लीद्वारे चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून टेक्नॉलॉजीच्या द्वारे कार चोरी करणाऱ्या या टोळीचा मास्टर माइंड आणि इतर तिघे अजूनही फरार आहेत.
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबरच्या सुमारास नागपुरातून एका नंतर एक अशा सहा महागड्या कार चोरीला गेल्या होत्या. विशेष म्हणजे चोरी गेलेल्या सर्व कार क्रेटा किंवा सेल्टोस अशा महागड्या ब्रँडच्या होत्या. आणि चोरट्यांनी अत्यंत शिताफीने या सर्व कार चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून पोलिसांना दिसले होते. नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा लक्षात आले की, चोरीला गेलेल्या सर्व महागड्या कार हाईअँड स्वरूपाच्या असून त्यांच्यामध्ये लॉकिंग सिस्टीमसाठी सॉफ्टवेअर वापरले जात होते. चोरट्यांच्या या टोळीने कदाचित बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व कारची ओरिजिनल किल्ली आधी डीऍक्टिव्हेट केली होती आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच नवी किल्ली रजिस्टर करून त्याच्या मदतीने सहजतेने वेगवेगळ्या ठिकाणातून एकानंतर एक क्रेटा आणि सेलटोस कार चोरी केल्या होत्या.
धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांच्या या टोळीने नागपूर शिवाय दिल्ली आणि हैदराबाद सारख्या मोठ्या शहरांमधूनही अशा महागड्या कार चोरल्या होत्या आणि नंतर त्यांची विक्री दुसऱ्या शहरात केली होती. दिल्लीतून चोरी झालेली अशीच एक कार नागपुरात बनावट नंबर प्लेटने वापरली जात असताना ती पोलिसांच्या हाती लागली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.
नागपुरातून चोरलेल्या कारची थेट नागालँड, मणिपूरमध्ये विक्री
दरम्यान 24 ऑक्टोबरच्या जवळपास नागपुरातून चोरलेल्या कार थेट नागालँड आणि मणिपूरमध्ये विकण्यात आल्याचा खुलासा ही पोलिसांच्या तपासात झाला आहे. सध्या नागपूर पोलिसांनी या प्रकरणी एक कोटी पेक्षा जास्त किमतीच्या आठ कार जप्त केल्या असून उर्वरित कार नागालँड मधून परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ज्या महागड्या कंपन्यांच्या कार या टोळीने चोरल्या आहेत. त्या कंपनीतील काही आजी किंवा माजी कर्मचारी कार चोरीच्या या गुन्ह्यात सहभागी असतील अशी शंका पोलिसांना आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे.
चोरट्यांची ही टोळी कार कशी चोरायची?
- सुरुवातीला काही चोरटे शहरात फिरून रात्रीच्या वेळेला रस्त्यावर पार्क होणाऱ्या महागड्या कार हेरून ठेवायचे...
- मोका मिळताच रात्रीच्या वेळेला टोळीतील काही सदस्य ड्रायव्हर साईडची काचेची खिडकी फोडून कारमध्ये प्रवेश करायचे...
-नंतर बनावट सॉफ्टवेअरच्या आधारे कारची ओरिजिनल किल्ली डीऍक्टिव्हेट करायचे..
-त्याच बनावट सॉफ्टवेअरच्या मदतीने लगेच नवीन किल्ली ऍक्टिव्हेट केली जायची..
- त्यानंतर चोरटे कार घेऊन फरार व्हायचे आणि पुढे टोळीतील दुसऱ्या सदस्यांच्या हाती कार सोपवून ती परराज्यात पाठवून द्यायचे..
- प्रत्यक्षात कार चोरी करणारी टोळी नव्या चोरीच्या कामात लागायची.
हे ही वाचा