(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Car Accident: धनिकपुत्राच्या ब्लड रिपोर्टबाबत पोलीस आयुक्तांकडून महत्त्वाचं वक्तव्य, दोनवेळा सॅम्पल्स का घेतली?
Pune News: दोन्ही प्रकरणांचा तपास करुन आरोपीला शिक्षा मिळेल, यासाठी प्रयत्न करु. आम्ही विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. ते कोर्टात आमची बाजू भक्कमपणे मांडतील, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे: पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या चाचणीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक महत्वाची माहिती समोर आणली आहे. रविवारी पहाटे अडीच वाजता अपघात (Pune Car Accident) झाल्यानंतर 11 वाजता अल्पवयीन आरोपीची पहिल्यांदा रक्ताची चाचणी (Blood Test) करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीची पुन्हा एकदा ब्लड टेस्ट झाली. या दोन्ही ब्लड टेस्टचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ब्लड टेस्टचे नमुने एकाच व्यक्तीचे आहेत की, नाही हे तपासून घेण्यास सांगितले आहे. हे दोन्ही रक्ताचे नमुने आरोपीचेच आहेत का, याची खात्री अद्याप फॉरेन्सिक लॅबकडून झालेली नाही, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
आम्ही आरोपीवर सर्वप्रथम 304 अ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये फक्त तीन वर्षांची शिक्षा आणि यामध्ये जामीन मिळण्याची मुभा होती. पण त्यानंतर आम्ही नंतर आरोपीवर 304 कलमातंर्गत गुन्हा दाखल केल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी पहिल्याच एफआयरमध्ये आरोपीवर 304 कलम का लावले नाही, पोलीस ठाण्यात आरोपीला कोणत्या सुविधा पुरवण्यात आल्या का, या सगळ्याची चौकशी करण्यात आल्या. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. आम्ही हे प्रकरण धसास लावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु आणि हे प्रकरण अंतिम निष्कर्षापर्यंत नेऊ, असे आश्वासन अमितेश कुमार यांनी दिले.
आम्ही स्ट्राँग केस तयार करु, जेणेकरुन आरोपी सुटणार नाही: अमितेश कुमार
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत याप्रकरणाचा तपशील पुन्हा एकदा सांगितला. हा अपघात रविवारी पहाटे अडीच वाजता घडला. त्यानंतर साधारण आठ वाजण्याच्या सुमारास स्थानिक पोलीस ठाण्यात 304 अ कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांना पूर्ण घटनाक्रम कळाल्यानंतर दुपारी 12 वाजता आरोपीविरोधात 304 कलम लावण्यात आले. हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम आहे.
त्याचदिवशी आम्ही बालहक्क न्यायालयात हे नृशंस कृत्य आहे, आरोपीला सज्ञान म्हणून वागवावे, अशी विनंती केली. त्याला रिमांड होममध्ये पाठवण्याचीही आमची मागणी होती. मात्र, बालहक्क न्यायालयाने आमच्या दोन्ही मागण्या फेटाळल्या. त्यावर आम्ही वरिष्ठ न्यायालयात गेलो, पण त्यांनीही पु्न्हा हे प्रकरण बालहक्क न्यायालयाकडे पाठवले. आता बालहक्क न्यायालयाने आरोपीला सज्ञान ठरवण्यासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे. यादरम्यान आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली. त्यांना दिवस कोठडी सुनावण्यात आली. तर मुख्य आरोपला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही सदोष मनुष्यवध आणि वडील आणि बार, हॉटेलच्या मॅनेजरवरील आरोप या दोन्ही प्रकरणांमध्ये बारकाईने तपास करत आहोत. आम्ही दोन्ही प्रकरणांमध्ये एकदम वॉटर टाईट केस तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन्ही प्रकरणांचा तपास करुन आरोपीला शिक्षा मिळेल, यासाठी प्रयत्न करु. आम्ही विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. ते कोर्टात आमची बाजू भक्कमपणे मांडतील, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. आम्ही याप्रकरणात शक्य ते सर्वकाही करु आणि हे प्रकरण शेवटापर्यंत नेऊ, अशी ग्वाही अमितेश कुमार यांनी दिली.
आणखी वाचा