Pune bypoll election : आधी माघार... अन् नंतर थेट व्हिलचेअरवरुन एन्ट्री; गिरीश बापटांच्या उपस्थितीमुळे कसब्यात 'कमळ' फुलणार?
नाकात नळी, थरथरते हात अन् व्हिलचेअरवर कसब्याचे किंगमेकर गिरीश बापटांची केसरी वाड्यात दमदार एन्ट्री करत पुन्हा एकदा पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे.
Pune bypoll election : कसब्याचे किंगमेकर (Pune Bypoll Election) म्हणून ओळख असणारे खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांनी जिवाची तमा न बाळगता पक्षासाठी पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांनी हजेरी लावली आहे. नाकात नळी, थरथरते हात अन् व्हिलचेअरवर कसब्याचे किंगमेकर गिरीश बापटांनी केसरी वाड्यातील पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहत पुन्हा एकदा पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे.
खासदार गिरीश बापटांच्या अध्यक्षतेखाली टिळक कुटुंबीयांच्या केसरी वाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मुक्ता टिळक यांचे कुटुंबीय देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासोबतच भाजपचे उमेदवार हेमंत रासने, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर, शैलेश टिळक, कुणाल टिळक उपस्थित होते. आजारपणामुळे त्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं शक्य नव्हतं. मात्र त्यांनी आपल्या भावना वजा संदेश एका कागदावर लिहून दिला आणि हेमंत रासने यांना कार्यकर्त्यांना वाचून दाखवायला सांगितलं.
बापटांनी कोणत्या टीप्स दिल्या?
तुम्हा सगळ्यांना बऱ्याच दिवसांनी भेटून आनंद वाटला. सगळ्यांना सुरुवातीला धन्यवाद देतो. माझ्या आजारपणामुळे मला सगळ्यांशी बोलणं शक्य होत नाही आहे. सर्वांनी खूप काम करा, उमेदवार नक्की निवडून येईल. तुमच्याशी वेळोवेळी संपर्क करेन, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एका कागदावर लिहून दिला.
मागील चाळीस वर्ष गिरीश बापट यांचे कसब्यावर वर्चस्व आहे. त्यांनीच दिवंगत आमदार मुक्ता टिळकांना राजकारणात आणलं होतं. आज त्यांच्याच निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी आजारी असतानाही प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओखळला जातो. मात्र कसब्यात यंदा ब्राह्मणांना उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. त्यात महाविकास आघाडी कसब्यातील बंडखोरी रोखण्यात यशस्वी झाले. ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा समोर ठेवत हिंदू महासंघाने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं होतं.
आधी माघार... अन् नंतर थेट व्हिलचेअरवरुन एन्ट्री
कालच(15 फेब्रुवारी) ला खासदार गिरीश बापट यांनी आजारपणाचं कारण देत प्रचारातून माघार घेतली होती. त्यांनी पत्र काढत यासंदर्भात माहिती दिली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाली. गेले तीन महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे खूप कमी काम केले असून तरीसुद्धा मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणाच्या कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरुन प्रचार करु शकणार नाही, असं त्यांनी पत्राद्वारे सांगितलं होतं. मात्र आज त्यांनी केसरी वाड्यात व्हिलचेअरवरुन त्यांनी बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे गिरीश बापटांच्या या प्रचारात सहभागी होण्याच्या निर्णयामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.