मोठी बातमी! पुण्याच्या कलेक्टरांनी मानसिक छळ केल्याचा पूजा खेडकरांचा आरोप, तक्रार दाखल
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांनी पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना अवास्तव मागण्या केल्या होत्या. त्यांच्याविरोधात पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला अहवाल पाठवला आहे.
वाशिम : वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणाला (IAS Pooja Khedkar) आता वेगळं वळण लागलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase IAS) यांनी आपला मानसिक छळ (Mental Torture) केल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली आहे.
सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांच्या विरोधात राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यानंतर आता पूजा खेडकरांची कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. पूजा खेडकरांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलं आहे.
Probationary IAS officer Puja Khedkar lodges police complaint against Pune district collector for harassment: official
— Press Trust of India (@PTI_News) July 16, 2024
पुणे कलेक्टरांनी छळवणूक केल्याचा आरोप
पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणूक केल्याची तक्रार केली आहे. खेडकरांची ही तक्रार सामान्य विभागाकडे वर्ग करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी त्यावर कारवाई करतील.
पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असून पुण्यामधील त्यांची छोटीशी कारकिर्द वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची तक्रार राज्य शासनाकडे केली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.
पुण्यामध्ये असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याचा आणि खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून फिरल्याचा आरोप पूजा खेडकरांवर करण्यात आला. तसेच एक प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना पूजा खेडकरांनी कार्यालय, शिपाई अशा अवास्तव मागण्या केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पूजा खेडकरांना मसुरीला परत बोलावले
पुण्यामध्ये कार्यरत असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि इतर अधिकाऱ्यांनी आपली छळवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. पूजा खेडकरांनी ही तक्रार सोमवारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर केंद्र स्तरावरून वेगवान सूत्रे फिरली आणि पूजा खेडकरांचा प्रशिक्षण कालावधी संपवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पूजा खेडकरांना आता 23 जुलैच्या आधी मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात परत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही बातमी वाचा :