Pune : पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करुन हिंजवडीच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव
पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करुन हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर खोटी साक्ष आणि तपास चुकीच्या पद्धतीने करावा यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे.
पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करुन पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्यात खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करावा यासाठी दबाव टाकल्याचे पोलीस अधिकारी नकुल न्यामने यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (28 मार्च) घडला.
अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्तीचा एपीआय नकुल न्यामने यांना फोन आला होता. अश्रफने हा फोन अमित कलाटेसाठी फोन केला होता. अमित कलाटेवर जमिनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असून आणखी काहींच्या लेखी तक्रारीही आलेल्या आहेत. याच प्रकरणात एपीआय न्यामने यांनी अधिकचा तपास न करता, ते प्रकरण मिटवण्यावर भर द्यावा, असा दबाव टाकत असताना पार्थ पवार यांच्या नावाचा वापर केला.
अश्रफ आणि एपीआय न्यामने यांच्यात झालेला संवाद असा....
"तुमच्याकडे अमित कलाटेचा विषय तपासासाठी आहे का? तुमचा त्या विषयात काय स्टँड आहे? मी आणि पार्थ पवारांचे पीए सागर जगताप हे अमित कलाटेचे खास मित्र आहोत. त्यामुळे तुम्हाला मी जे सांगतोय ते ऐका. वाटल्यास मी तुम्हाला भोसलेनगर येथील जिजाई बंगल्यावर (पुण्यातील अजित पवारांचा बंगला) थेट समोर घेऊन जाईन. अमितचा काय विषय आहे तो मिटवून घ्या, अन्यथा विषय वरपर्यंत घेऊन जावं लागेल. राष्ट्रवादी प्रवक्ता उमेश पाटील यांनीही मला तुम्हाला विचारुन घ्यायला सांगितले आहे."
असं म्हणत अश्रफ मर्चंटने तपासावरुन आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असं एपीआय नकुल न्यामने यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आता अश्रफ मर्चंट ही व्यक्ती नेमकी कोण आहे? पार्थ पवार यांच्या नावाचा त्याने का वापर केला? हे अटकेनंतर स्पष्ट होणार आहे.