Video: 'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Video: मयूर आणि तुषार हे दोघे आप्या काही मित्रांच्या सोबतीने पवनाधरण परिसरात फिरायला गेले होते.
पुणे : राज्यातील शिक्षणाची पंढरी समजलं जाणारं पुणे (pune) शहर आता आयटी हब आणि उद्योग व सेवा क्षेत्राची देखील पंढरी होत आहे. त्यामुळे, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुणाई इथं येतेय. त्यामुळे, येथील आकर्षण असलेल्या निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंदही घेतला जातो. मात्र, भुसावळमधून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या 2 तरुणांना येथील पर्यटनाचा मोह जीवावर बेतला आहे. पवना धरणात(Pawana dam) दोन तरुण बुडाल्याची घटना काल बुधवार दुपारी बाराच्या सुमारास घडली. मयूर भारसाके आणि तुषार अहिरे ह्या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून एकाचा मृतदेह हाती लागला आहे. मात्र, तुषार अहिरे यांचा शोध घेण्यात येत आहे. या घडलेल्या घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून दोन मित्रांची चूकच त्यांच्या जीवावर बेतली.
मयूर आणि तुषार हे दोघे आप्या काही मित्रांच्या सोबतीने पवनाधरण परिसरात फिरायला गेले होते. यावेळी पवना धरणाच्या पाण्यात मित्र पोहोण्यास उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मयूर भारसाके आणि तुषार आहेर हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. मात्र, या दोन मित्रांना त्यांची एक चूक जीवावर बेतली. कोणाला न सांगता बोटी पाण्यात घेऊन उतरण्याची चूक त्यांनी केली, तीच चूक त्यांच्या जीवावर बेतली. बोट अचानक पलटली अन् यात एक जण बुडू लागला, मग दुसऱ्या बोटीतून वाचवण्यासाठी मित्र त्याच्याजवळ पोहचला. मात्र, यात दोघेही बुडाले. ही घटना तिसऱ्या मित्राच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आपले मित्र बोटी घेऊन पाण्यात उतरले होते, ते बुडत असताना त्यांच्या इतर इतर मित्रांना हे दोघे नाटक करत असल्याचं वाटलं. पण, खरंच हे दोघे बुडाले आहेत, हे जेव्हा मित्रांना समजलं तेंव्हा खूप उशीर झाला होता. वन्यजीव रक्षक पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. रवींद्र भारसाके आणि तुषार आहिरे अशी या पर्यटक मित्रांची नावे असून ते भुसावळ येथील रहिवासी आहेत. सध्या कामानिमित्त ते बालेवाडी क्रीडांगण परिसरात रहात होते. मित्रांसोबत पर्यटनासाठी आले तेंव्हा ही घटना घडली. या घटनेनं पुन्हा एकदा धरण परिसरातील पर्यटनाचा आणि तेथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी पुण्यातील भूशी डॅम परिसरातही अशीच पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. एकाच कुटुंबातील 4 जणांचा पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याने मृत्यू झाला होता, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने भूशी डॅमवरील पर्यटनास बंदी घातली होती. आता, पवना डॅमवरील या घटनेनं पुन्हा एकदा हीच चर्चा होत आहे.
तुषारचा शोध सुरू
सुरुवातीला मित्रांकडून टिंगल केली जात आहे किंवा गंमती सुरू आहेत, असा समज झालेल्या इतर मित्रांना, आपले मित्र डोळ्यादेखत पाण्यात बुडत असल्याची खात्री झाल्यानंतर मित्रांनी आरडाओरड केली. त्यावेळी, स्थानिक ग्रामस्थ आणि लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या दोघांचा पवना धरणाच्या पाण्यात शोध घेतला. रात्री उशिरा मयूरचा मृतदेह शोध पथकाला सापडला असून तुषार अहिरे याचा शोध अजूनही सुरूच आहे. हे दोन पर्यटक पुण्याच्या बालेवाडी येथे एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होते. याच कंपनीतील आठ ते दहा मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, याआधीही पाण्याचा अंदाज न आल्याने काही पर्यटकांचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.