कत्तलखाने, कायदा, हिंदू, पाकिस्तान ते अफजलखानाचा वध, सासवडमध्ये नितेश राणेंचं आक्रमक भाषण
Nitesh Rane : गायीची कोण कत्तल करत असेल तर आम्ही भूमिका घ्यायची नाही? कत्तलखाने बंद केले पाहिजेत असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं.
Nitesh Rane : राज्यात हिंदुत्ववादी विचारांचा सरकार आलेला आहे. कडवट हिंदुत्ववादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत. त्यामुळे आम्हाला टोकाची भाषणे आणि टोकाचा इशारा देण्याची गरज नसल्याचे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं. ते पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये बोलत होते. आम्ही जर टोकाचे इशारे दिले तर आम्हाला समाज विचारेल त्यामुळं आता टोकाची भाषणे करायची गरज नाही. पोलिसांनी निवांत राहिलं तरी चालेल. देशात आणि राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पाळलं जातं. कायदा मोडून आम्हाला मदत करा असे कोणी म्हणणार नसल्याचे राणे म्हणाले.
अफजलखानाचा वध करतानाचा फोटो लावू नका. काही लोकांच्या भावना दुखवतील असं मोडक साहेबांना सांगण्यात आलं. आमच्या राज्यात वधाचा फोटो लावणार नाही तर मग काय पाकिस्तानात लावणार का? असेही राणे म्हणाले. एवढ्या केसेस अंगावर घेतल्यावर कायद्याचा अभ्यास घ्यावाच लागतो. त्याच्यामुळे आमचा कायद्याचा अभ्यास आहे. जर कायदा असेल तर मी ते पोस्टर काढायला लावतो. चार दोन लोकांच्या भावना दुखावत असतील तर त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जाऊ देत. अनेक लोक तिकडं दाढी करुन कुरवाळत असतात असेही राणे म्हणाले.
कत्तलखाने बंद केले पाहिजेत
अफजलखानाचा कोथळा काढण्याचा फोटो असलेला बॅनर जर कोणी काढला तर कुणाकुणाचे फोन येतील हे मी सांगणार नाही असेही राणे म्हणाले. गायीची कोण कत्तल करत असेल तर आम्ही भूमिका घ्यायची नाही? कत्तलखाने बंद केले पाहिजेत असे राणे म्हणाले. आम्ही सरकारमध्ये बसलोत आमचे सीसीटीव्ही सुरु आहेत. कुणाच्या घरी बिर्याणी जाते गोहत्या बंदी कायदा आहे. तर एकही कत्तलखाना सुरू असता कामा नये. आम्ही कत्तलखाने बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असले लाड आमच्या राज्यात चालणार नाहीत असेही राणे म्हणाले.
कायदा न पाळणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवा
ज्यांना कायदा पाळायला जमत नसेल त्यांना लाथ मारुन पाकिस्तानात पाठवा. बेकायदेशीर गोष्टीचा समर्थन करणाऱ्याचं समर्थन केलं जाणार नाही. मी फक्त आठवण करुन देण्यासाठी इथं आलोय. कडवट हिंदुत्व असलेलं सरकार आहे, त्यामुळं कायदा पाळा असेही राणे म्हणाले. आमच्या गडकिल्यावर जिथं दिसेल तिथं हिरवे चादर टाकतात. जिथे दिसते थडगे उभे करतात, कुठल्या इतिहासात लिहले याची परवानगी कोणी दिली? असेही राणे म्हणाले. टिपूच्या औरंरजेबच्या नावाने सातबारा लिहून दिलाय का? असा सवाल राणेंनी केला. जे बेकायदेशीर आहे त्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका अशा सुचनाही राणेंनी प्रशासनाला दिल्या.
हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी बेकायदेशीर वागणार असेल तर सोडणार नाही
आमच्या मिरवणुका जर 10 वाजेपर्यंत चालत असतील तर मोहरमच्या आणि ईदच्या मिरवणूक देखील 10 वाजेपर्यंत चालल्या पाहिजेत. आपण बोलणारे कमी आणि कार्यक्रम करणारे जास्त आहोत असेही राणे म्हणाले. तुमच्या हक्काचा माणूस सरकारमध्ये बसलाय फक्त एक फोन करा. बेकायदेशीर माणसाला कळेल कसं थरथर कापावे लागते ते असे राणे म्हणाले. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मला सल्ला द्यायचा आहे तुम्ही एकटे नाही. आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत. भगवा दारी मुख्यमंत्री म्हणून तिथे आहेत. त्यामुळं हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही घाबरायची गरज नाही असेही राणे म्हणाले. हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी बेकायदेशीर वागणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. मंत्री असल्याने आता बंधन आलेत. यापुढे हिंदुत्वाचे काम ताकदीने पुढे चालू ठेवा असेही राणे म्हणाले.
केरळ म्हणजे पाकिस्तान
केरळ म्हणजे पाकिस्तान आहे, म्हणूनच राहुल गांधींची बहीण तिथून निवडून येते. म्हणूनच सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात असा आरोप राणे यांनी केला. अफजलखानाचा वध हा कार्यक्रम होता लगेच दुसरे कार्यक्रम कॅन्सल केले. प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा आवाज म्हणून मी मंत्रालयात बसलोय. हे भगवाधारी महाराष्ट्र आहे असं काम आपल्याला राज्यात करायचे आहे. एक हिंदू म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहून काम करु असेही राणे म्हणाले.