Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, पुणे पोलिसांचे थेट ईडीला पत्र; पुणे, जामखेडमधील बेनामी संपत्तीवर टाच?
Nilesh Ghaywal: निलेश घायवळ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी निलेश गायवळ प्रकरणी थेट ईडीला पत्र पाठवले आहे.

Nilesh Ghaywal: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) निलेश घायवळच्या बेनामी संपत्ती आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ईडीला पत्र पाठवले आहे. गेल्या काही वर्षांत गायवळने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात तब्बल 60 पेक्षा अधिक जमीन खरेदी-विक्री व्यवहार केल्याचे समोर आले असून, त्यापैकी अनेक व्यवहार संशयास्पद आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
Nilesh Ghaywal: पुणे पोलिसांचे ईडीला पत्र
घायवळने विविध ठिकाणी, वेगवेगळ्या नावाने आणि काही ठिकाणी बेनामी पद्धतीने जमीन व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे. अनेक ठिकाणी दस्तऐवजांमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी हे व्यवहार संशयास्पद मानले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या व्यवहारांमधून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. पोलिसांच्या पत्रानंतर आता ईडीकडून निलेश गायवळच्या बेनामी मालमत्ता, बँक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांचा स्वतंत्र तपास सुरू होणार असल्याचे समजते.
Nilesh Ghaywal: ‘BOSS’ नंबर असलेली कार उसाच्या शेतात लपवली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी निलेश घायवळची आणखी एक कार जप्त केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावात उसाच्या शेतात ही कार लपवून ठेवली होती. “BOSS” अशी विशेष नंबर प्लेट असलेली ही गाडी (MH-12-8055) पोलिसांनी शोधून काढली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने थेट जामखेडमधून गाडी ताब्यात घेतली. याआधीही पोलिसांनी निलेश घायवळच्या पुण्यातील घरावर छापा टाकून त्याच्या अनेक मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे जप्त केली होती.
Nilesh Ghaywal: पासपोर्ट रद्द
निलेश घायवळविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असून, तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याने पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या आडनावात “घायवळ” ऐवजी “गायवळ” असे नाव वापरल्याचे आढळले होते. पोलिसांनी याबाबतचा अहवाल पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाला सादर केला होता. या अहवालानंतर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असून, त्याबाबतची औपचारिक आदेशपत्र (Order) प्रदेश कार्यालयातून जारी झाले आहे.
Nilesh Ghaywal: घायवळ कुटुंबीयांची 10 बँक खाती गोठवली
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी निलेश गायवळसह त्याच्या कुटुंबीयांची 10 बँक खाती गोठवली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 38 लाख 26 हजार रुपयांची रक्कम असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या खात्यांमध्ये निलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, पृथ्वीराज एंटरप्रायझेस यांची नावे असल्याचे समोर आले आहे.
आता पुणे पोलिसांच्या परवानगीशिवाय या खात्यांतील कोणतीही रक्कम काढणे किंवा व्यवहार करणे शक्य नाही.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























