Nilesh Chavan : निलेश चव्हाणची हुशारी, घटस्फोटित मैत्रिणीचा फोन वापरला,पोलिसांना पहिलं लोकेशन कसं सापडलं? नवी माहिती समोर
Nilesh Chavan : निलेश चव्हाण याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाणचं पहिलं लोकेशन कसं सापडलं याची माहिती समोर आली आहे.

पुणे: निलेश चव्हाणचं पहिलं लोकेशन घटस्फोटित मैत्रिणीमुळं मिळालं, पण या प्रकरणाशी तिचा संबंध नसल्याचं आढळल्यानं चौकशीनंतर पोलिसांनी तिला सोडून दिलं. वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवर बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर निलेशच्या लोकेशनचा पहिला क्लू तिच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळं लागल्याचं समोर आलंय. मात्र निलेशला अटक केलेल्या प्रकरणाशी तिचा काही संबंध नसल्याने चौकशीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिला सोडून दिलं.
निलेश पुण्यातून पसार झाला तेंव्हापासून ही मैत्रीण ताच्या सोबत होती अन दिल्लीतून ती पुण्याला परतली. आपण फिरायला जाऊ असं म्हणून निलेशने तिला सोबत ठेवलं अन तिच्या फोनचा वापर ही केला. अशातच पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं अन त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला. तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते.
दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खाजगी बसमध्ये बसला अन त्याची मैत्रीण पुण्याला परतली. मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली, परंतु तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला पोलिसांनी सोडून दिलं. मात्र तिच्याकडून दिल्लीतून गोरखपूरचा प्रवास केलेल्या खाजगी बसची माहिती मिळाली. ज्याचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय. हा पहिला क्लु मिळाला, त्यानंतर पोलीस नेपाळ कनेक्शनपर्यंत ही पोहचू शकले.
निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांनी काय जप्त केलं?
निलेश चव्हाणच्या घरुन तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे हे मोबाईल आहेत. तसेच निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट ही जप्त करण्यात आलेत. निलेश चव्हाण च्या कर्वेनगर च्या घरी पोलिसांनी दीड तास तपास केला. तपासात लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांचा मोबाईल बावधन पोलिसांनी जप्त केला. तपासाचा भाग म्हणून निलेश चव्हाण चे कॉल रेकॉर्ड देखील पोलीस तपासणार आहेत.
निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी
निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरुन अटक करण्यात आल्यानंतर त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकिलांनी वैश्नवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील इतर आरोपी यांच्यात मोबाइलवरुन संभाषण झाले आहे. त्या संभाषणाची माहिती पोलीसांना घ्यायची आहे. निलेशची वैश्नवीच्या आत्महत्येत काही भूमिका आहे का याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद केल्यानंतर त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.























