Bilkis Bano : बिल्कीस बानोच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात मुक निदर्शने
बिल्कीस बानो (Bilkis Bano) यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यात मुक निदर्शने करण्यात आली.
Bilkis Bano : 2002 साली झालेल्या गोध्रा दंगलीतील (Godhra incident) पीडिता बिल्कीस बानो (Bilkis Bano) यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यात मुक निदर्शने करण्यात आली. पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिट्री कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी काळी कपडे घातली होती. 'Bilkis Wants Justice', जातीयवादी भाजपा, महिला विरोधी भाजपा, बिल्कीस हम शरमिंदा है, जालीम अभी तक जिंदा है, स्मृती इराणी जवाब दो, बिल्कीस बानो को न्याय दो असे फलक हातात घेत मुक निदर्शने करण्यात आली.
एक समाज म्हणून पाहताना केवळ बिल्कीस बानो कुठल्या धर्माची आहे, या गोष्टींकडे न पाहता बिल्कीस एक महिला आहे. सर्व धर्म समभाव जपणाऱ्या भारत देशात बिल्कीस सारख्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला न्याय भाजप सारखा राजकीय पक्ष मोडून काढत असेल, तर हा न्यायालयाचा देखील अवमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने अकरा आरोपींना आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बिल्कीस बानोला घर आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. बिल्कीसने लढून न्याय मिळवला परंतू, दुर्दैव असे की देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशात स्त्री सक्षमीकरणाचे भाषण देत असताना गुजरातमधील भाजप सरकारने बिलकीस बानोच्या आरोपींची शिक्षा माफ केल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटल आहे. इतकेच नाही तर या आरोपींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात आरोपींचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी या आरोपींचे सत्कार केले. भाजप सरकार आपल्या या सर्व कृतीतून काय संदेश देऊ इच्छित आहे ? असा सवालही यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. देशातील मुस्लिम बांधवांप्रती भारतीय जनता पार्टीच्या मनात इतका द्वेष का आहे ? असा सवालही करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या:
- बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका, गोध्रा जळीतकांडवेळी घडली होती घटना
- बिल्कीस बानो प्रकरणी 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा कायम