Nana Patole On Pune Bypoll : धंगेकरांना उमेदवारी देणार का?, नाना पटोले म्हणतात...
पुण्याची लोकसभेची जागा कॉंग्रेसच जिंकणार असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. धंगेकरांना उमेदवारी देणार का? विचारल्यावर त्यांनी योग्य उमेदवाराला उमेदवारी देऊ असं स्पष्ट केलं आहे.
Nana Patole On Pune Bypoll : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणुकीच्या चर्चा सुरु आहे. त्यासाठी सर्व पक्ष कामालादेखील लागले आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोटनिवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पुण्याची लोकसभेची जागा कॉंग्रेसच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. धंगेकरांना उमेदवारी देणार का?, विचारल्यावर त्यांनी योग्य उमेदवाराला उमेदवारी देऊ असं स्पष्ट केलं आहे.
मागील काही दिवसापासून लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत आणि भाजप या दोन्ही पक्षात चढाओढ सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा केला आहे. मात्र काहीही झालं तरी ही लोकसभेची जागा कॉंग्रेसची आहे आणि जर निवडणूक झाली तर कॉंग्रेसचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यात ते बोलत होते.
धंगेकरांना उमेदवारी देणार का?
पोटनिवडणूक जाहीर झाली तर यासाठी नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली जाईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र ते स्वत: या निवडणुकीसाठी फार इच्छूक नाहीत अशाही चर्चांना उधाण आलं होतं. धंगेकरांना उमेदवारी देणार का?, असं विचारल्यास नाना पटोले यांनी धंगेकरांसोबतच बाकी इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल त्यावेळी योग्य उमेदवार देणार, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडीत धुसफूस?
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे पोस्टर्स भावी खासदार म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारीत ट्विस्ट पाहायला मिळाला होता. लोकसभेची जागा ही कॉंग्रेसची आहे, असा दावा कॉंग्रेसकडून केला जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या जगतापांच्या पोस्टर्सनंतर या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीदेखील इच्छुक असल्याचं दिसून आलं. त्यानंतर जगताप यांनी देखील मला संधी मिळाली तर मी निवडणूक लढवेन अशी उघडपणे भूमिका घेतली. त्यावर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ही जागा कॉंग्रेसचा असल्याचा दावा केला होता. 'मागील अनेक वर्षांपासून ही जागा काँग्रेस लढवत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत देखील महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसच लढवणार आहे, असं ते म्हणाले होते. या पोटनिवणुकीत कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी दोघांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यात अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्या नावाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एकच जागा कॉंग्रेस लढवत असते. बाकी लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढवण्यात येतात त्यामुळे कॉंग्रेस या जागेवर आपला दावा राखून आहे.