Pune News: महिलांना न्याय देण्यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अनोखा उपक्रम; 19 ते 21 जुलैला होणार तक्रारींवर सुनावणी
राज्य महिला आयोगाकडून "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात 19 ते 21 जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे
Pune News: राज्य महिला आयोगाकडून "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात 19 ते 21 जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड येथे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.
पुणे शहर भागातील तक्रारींची जनसुनावणी 19 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. पुणे ग्रामीण मधील तक्रारींवर 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी घेण्यात येणार आहे. 21 जुलै रोजी ज्ञानज्योती सावित्री बाई फुले स्मारक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ पिंपरी-चिंचवड भागातील तक्रारींची जनसुनावणी सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसंच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम राज्य महिला आयोगाकडून होणार आहे. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिलांवर होणारे अत्याचार, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कायम तत्पर असतात. अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष देत तोडगा काढला आहे आणि पिडित मुलीला किंवा महिलेला न्याय मिळवून दिला आहे. पिडितांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचं काम करतात. मात्र "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाद्वारे अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत.