(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MHADA Pune Lottery 2021 | पुणे म्हाडाच्या 5647 घरांसाठी सोडत, संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या वेबसाईटवर निकाल
MHADA Pune Lottery 2021 : म्हाडाच्या पुणे विभागातील 5647 घरांसाठी आज ऑनलाईन लॉटरी जाहीर झाली. भाग्यवान विजेत्यांची यादी संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे.
पुणे : पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील म्हाडाच्या घरांची लॉटरी आज (22 जानेवारी) ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाली आहे. पुण्यातील नेहरु मेमोरियल हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित होते.
'वेबकास्टिंग'च्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. अर्जदारांना http://bit.ly/PuneLottery2021 या लिंकवर सोडत पाहता येणार आहे. सोडतीचा निकाल सायंकाळी सहा वाजता https://lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
या लॉटरीमधे पश्चिम महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांमधील 5647 फ्लॅट्स आणि काही जमिनीच्या भूखंडांचीही विक्री होत आहे. या लॉटरीमध्ये नशीबवान ठरणाऱ्यांना ई-मेल आणि मेसेजद्वारे त्याची माहिती दिली जाणार आहे. सोबतच भाग्यवान विजेत्यांची यादी संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे.
कोविड-19 महामारीदरम्यान ऑनलाईन पद्धतीने घरांची लॉटरी जाहीर केली जात आहे. कोरोना महामारीत उद्योग व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या तरीही म्हाडाच्या घरांसाठी अर्जांचा पाऊस पडल्याचं चित्र आहे. 5647 घरांसाठी तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त अर्ज म्हाडाकडे आले होते. परंतु त्यापैकी काही जणांचंच घराचं स्वप्न साकार झालं आहे.
पुणे आणि पिंपरी चिचवड शहरामध्ये पाच हजार 217सदनिका आहेत. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हाडाकडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत म्हाळूंगे (चाकण), जि. पुणे - 514 सदनिका, तळेगांव दाभाडे (जि. पुणे) - 286 सदनिका, करमाळा (जि. सोलापूर) - 77 सदनिका, सांगली - 74 सदनिकांचा समावेश आहे.
म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत मोरवाडी पिंपरी (पुणे) - 87 सदनिका, पिंपरी वाघेरे (पुणे) - 992 सदनिका, सांगली येथे 129 सदनिका आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत म्हाळुंगे (जि. पुणे) येथे 1880 सदनिका, दिवे (जि. पुणे) 14 सदनिका, सासवड (जि. पुणे) 4 सदनिका, सोलापूर येथील 82 सदनिकांचा समावेश आहे.
20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीत 410 सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत 1020 सदनिका व कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत 68सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सर्व सदनिका अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील 68 भूखंड देखील या सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.