MHADA Lottery : म्हाडासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, पुणे मंडळाच्या 5863 घरांसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
MHADA Pune Lottery : म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरता 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : म्हाडाच्या पुणे (MHADA Pune) गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या 5863 सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
5 सप्टेंबर 2023 रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आजपर्यंत सुमारे 44,510 अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिवास प्रमाणपत्र आणि इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार तसेच नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी पुणे मंडळाने सोडतीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.
असं असेल नवीन वेळापत्रक
नवीन वेळापत्रकानुसार 30 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 08 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 20 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या (MHADA Konkan Division Houses Lottery) वतीनं ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच 311 सदनिकांसाठी लॉटरी जाहीर केलेली. म्हाडाच्या या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच म्हाडाकडून अर्जविक्री- स्वीकृतीला एका महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीनुसार, आता सोडतीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच, 13 डिसेंबरला सोडत काढली जाणार आहे.
ही बातमी वाचा: