Maval Loksabha Shrirang Barne : कमळावर लढणार की धनुष्यबाणावर, श्रीरंग बारणेंनी ठामपणे सांगून टाकलं; म्हणाले...
मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून तर्कवितर्क लढवले जातायेत, असं असतानाच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी मी महायुतीचा उमेदवार असेल, असं ठामपणे म्हटलंय.
पुणे : मावळ लोकसभेत (Maval Loksabha) महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून तर्कवितर्क लढवले जातायेत, असं असतानाच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barne) मी महायुतीचा उमेदवार असेल, असं ठामपणे म्हटलंय. पण कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? असं विचारल्यावर 'मी महायुतीचा उमेदवार असेल' असं म्हणत बारणेंनी संदिग्धता कायम ठेवली आहे. बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने ही विरोध दर्शविला आहे.
पिंपरी भाजपने कमळावरचा उमेदवार असायला हवा, मग बारणे असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यालाच अनुषंगाने बारणे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभेत सुरू होती. अशातच मी महायुतीचा उमेदवार असेन, असं म्हणत बारणेंनी आणखी संदिग्धता वाढवली आहे. तर ज्या उमेदवाराचा मतदारसंघात थांगपत्ता नाही, त्या उमेद्वाराबद्दल मी बोलणार नाही. असं म्हणत महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंची (Sanjog Waghere) खिल्ली उडवली.
मावळमधील महायुतीचा उमेदवार कोण असेल असं विचारल्यावर श्रीरंग बारणे ठामपणे म्हणाले की, मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार मीच असेल. महायुतीकडून भाजप, शिवसेनेसोबत सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे अजित पवार या महायुतीच्या घटकपक्षांचा उमेदवार काही दिवसातच स्पष्ट होईल. त्यात महायुतीचा उमेदवार मीच असेल.
संजोग वाघेरेंची खिल्ली उडवली!
उबाठाने मावळमधील उमेदवारी जाहीर केला आहे. संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की माझी लढत थेट भाजपसोबत असेल मात्र यावरच आता श्रीरंग बारणेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. बारणे म्हणाले की, ज्या उमेदवाराचा मला थानपत्ता नाही त्या उमेदवारासंदर्भात मी काहीही बोलू इच्छित नाही. मावळमधून भाजपच्या चिन्हावर उमेदवारी मिळाली तर लढणार का?, असं विचारल्यास बारणे म्हणाले, की या संदर्भात कोणतंही वक्तव्य करणं उचित ठरणार नाही. मात्र श्रीरंग बारणेच उमेदवार असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सुनिल शेळकेंचा बारणेंना विरोध
कमळाच्या चिन्हावर बारणे उमेदवार असतील, तर आमची हरकत नसेल, असं भाजपचे पदाधिकारी म्हणाले होते, पण मावळ लोकसभेतून बारणेंना उमेदवारी का देऊ नये हे सुचविणारा एक अहवालच आमदार शेळके यांनी तयार केला आहे. तो अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्यात आला आहे. त्याचाच दाखला देत, मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी यावर आमदार शेळके ठाम आहेत. त्यांनी बारणेंना स्पष्ट विरोध केला आहे.
इतर महत्वाची बातमी-