Pune Crime News: घरफोडी करणारे हायप्रोफाईल 'बंटी-बबली' अखेर अटकेत; 1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यात चोरी करणाऱ्या हायप्रोफाईल बंटी-बबलीच्या जोडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या बंटी बबलीकडून तब्बल 1 कोटी 13 लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Pune Crime News: पुण्यात (pune) चोरी करणाऱ्या हायप्रोफाईल बंटी-बबलीच्या (Pune Crime) जोडीला पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. या बंटी बबलीकडून तब्बल 1 कोटी 13 लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांना या बंटी-बबलीला अटक करण्यात यश आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू दुर्योधन काळमेध (वय 45 वर्षे) आणि त्यांची मेहुणी सोनिया श्रीराम पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोनिया ही बीए एलएलबीचं शिक्षण घेत आहे तर राजू काळमेध याचा पुण्यात हॉटेलचा व्यावसाय आहे. अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोघे चोरी करायचे. याच परिसरात घरफोडीचा पोलीस तपास करताना पोलिसांनी परिसरातील अनेक ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी राजू दुर्योधन याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं आणि त्याची सखोल चौकशी करायला सुरुवात केली. मात्र चौकशीत आरोपी काही माहिती द्यायला तयार नव्हता. मात्र पोलिसांनी त्याच्याकडून कबुली करुन घेतली. पोलिसांच्या धाकाने त्याने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली केली. या सगळ्या गुन्ह्यात तो एकटाच नसून त्याची मेहुणी देखील यात सहभागी असल्याचं त्याने सांगितलं. सोनिया या दरम्यान सगळा मुद्देमाल मुंबईला पळून जायच्या तयारीत होती, मात्र त्याआधीच पोलिसांनी सोनियाला ताब्यात घेतलं.
डायमंड अन् सोन्याची चोरी
सोनिया हिच्याकडून चोरीला केलेले हिरे, सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि चारचाकी गाडी असा एकूण 1 कोटी 13 लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींचे वडगाव, वाकड, नाशिक, शिर्डी या ठिकाणी फ्लॅट आहेत तर वाकड येथे हॉटेल आहे. तसेच नाशिक येथे फार्म हाऊस आणि पोल्ट्री व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे.
यापूर्वी देखील पुण्यात बंटी-बबली जोडीने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. खानदेशची लोकप्रिय कलाकार दीपू क्वीन आणि तिच्या प्रियकराने तात्काळ लोन मिळवून देतो असं सांगून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन हेमराज बावसार आणि दीपाली पौनीकर उर्फ दीपू क्वीन यांना अटक केली होती. या बंटी बबलीच्या जोडीने तब्बल दीडशे जणांना गंडा घातला होता. खान्देशी गाण्यांची उत्तर महाराष्ट्रात मोठी चलती आहे. या गाण्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना उत्तर महाराष्ट्रात मोठी प्रसिद्धीही मिळते. दीपू क्वीन ही खान्देशी गाण्यांमधली प्रसिद्ध कलाकार आहे.