(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या घरासमोर रात्री बारा वाजता व्हिडीओ काढणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्याला अटक
कॉंग्रेसचा कार्यकर्ता संदीप कुदळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर संदीप कुदळेला पोलीसांनी अटक केली आहे आणि समाजामधे तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Chandrakant Patil : कॉंग्रेसचा कार्यकर्ता संदीप कुदळे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रात्री बारा वाजता त्यांच्या कोथरुडमधील बंगल्याच्या बाहेर व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर संदीप कुदळेला पोलिसांनी अटक केली आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या व्हिडीओमधे या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे साहित्य वाचावे, असे आवाहन केले. त्यासोबतच त्याचं कार्याचं चिंतन करावं, असाही सल्ला त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबतीत चंद्रकांत पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरुन सगळीकडे राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली होती. राज्यात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि एका पत्रकाराला अटक देखील करण्यात आली होती. पत्रकाराला आता सोडण्यात आलं आहे.
शाईफेकीनं वातावरण पेटलं
कॉंग्रेसचे आणि इतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ यांनी शाईफेक केली असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या शाईफेकीवरुन राजकारण तापलं आहे. बारामतीत देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर जो कोणी शाईफेक करेल त्याला 51 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असून, हिंमत असेल तर समोर या, असं आव्हान असं चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना केलं होतं.
चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत वाढ
चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शाईफेक प्रकरणानंतर त्यांच्या दौऱ्याच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सकाळी साडे नऊ वाजेपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज ते अनेक ठिकाणी कामानिमित्त भेटी देणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.